महाविकास आघाडीच्या सभेला बसणार फटका
ठाणे: आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याचे बोलले जात होते. दरम्यान अध्यादेश आणि विकासकामांची उद्घाटने यामुळे निवडणूक विभागाकडून १५ मार्चनंतरच देशात आचारसंहिता लागणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील सूत्राने दिली आहे.
लोकसभेच्या ५४८ जागांकरिता देशात निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान २० एप्रिलनंतर होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तसेच प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरी सुविधांच्या कामाचा तसेच उदघाट्नाचा सपाटा लावला होता, परंतु निवडणूक विभागाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नाही.
राज्यातील मंत्री मंडळाच्या सोमवार आणि मंगळवारी अशा सलग दोन दिवस बैठका होणार आहेत. त्या बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाचा अध्यादेश पुढील दोन दिवसांत काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी देशातील काही राज्यमंधील नागरी सुविधांच्या कामाची उद्घाटने करणे शिल्लक आहेत, त्यामुळे १५ मार्चपूर्वी आचारसंहिता लागू होणार नाही. मात्र १७ मार्च रोजी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबई येथिल शिवाजी पार्क मैदानात विकास आघाडीच्या जाहीर सभेने होणार असल्याने ही सभा होऊ नये या करिता १५ मार्चनंतर केव्हाही आचारसंहिता देशात लागू केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने माध्यमांना काही मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही धर्माचे धार्मिक स्थळ दाखविण्यात येऊ नये, देवाच्या मूर्ती दाखवू नयेत, देशाचा तसेच परदेशी ध्वज दाखवू नये, शासकीय इमारती अस्पष्ट दाखविण्यात याव्यात, अशी सुमारे 25 ते 30 मार्गदर्शक तत्वे निवडणूक आयोगाने आज जाहीर केली आहेत.