निरीक्षण महत्वाचं – डॉ. निलेश साबळे

डॉ. निलेश साबळे हे नाव आपल्याला नवीन नाही. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या निलेशने उत्तम वैद्यकीय शिक्षणाबरोबरच आपल्यातील अंगभूत विनोदाची कला ओळखून ती जोपासत त्याने कलेच्या क्षेत्रात यशाचं शिखर गाठलं. एक अभिनेता, दिग्दर्शक, मिमिक्री कलावंत, पटकथा लेखक, सूत्रसंचालक अशा अनेक भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी निलेश साबळे याला पाहिलं आहे.
‘चला हवा येऊ द्या’ची एकहाती सूत्रे सांभाळताना ”कसे आहात सगळे? मजेत ना? हसताय ना? हसायलाच पाहिजे”, असे म्हणत प्रत्येक भूमिका जीव ओतून करताना तो आता घराघरांत पोहोचला आहे. चला हवा येऊ द्या सोबतच झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुद्धा डॉक्टर निलेश साबळे सांभाळत आहेत.
‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेतशाळाना निखळ आनंद देत खळखळून हसायला लावतो. यातील प्रसंगांच्या नवनव्या कल्पना तुला कशा सुचतात याबद्दल बोलताना निलेश म्हणाला, “सतत आजूबाजूचं निरीक्षण करत राहणं म्हणजेच माणसं बघत राहणं आणि सतत काही ना काही शोधत राहणं याच्यातूनच हे सुचत जातं. सतत माणसं बघायची, माणसं शोधत राहायची. रिक्षात जरी मी बसलो तरी मी बघायचो की, तो रिक्षा कशी चालवतो? काही गंमत घडते का? लहानपणापासूनच मला विनोदाची फार आवड होती. शाळेत असताना गॅदरिंगला मी स्वत:च छोट्या छोट्या गोष्टी लिहायचो व सादर करायचो. पुढे कॉलेजला गेल्यावरही विनोदावरचं प्रेम वाढतच गेलं. दिवसभर डोक्यात विचार चालूच असायचे.”