ठाणे पूर्वेतून हरकती तळपल्या

* प्रभाग रचनेला १९६५ हरकती
* निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढली

ठाणे : पूर्व ठाण्यातील नगरसेवकांची संख्या कमी करून हा भाग पश्चिमेला आणि वागळे इस्टेट भागाला जोडल्याबद्दल सुमारे ६०५ हरकतींसह प्रभाग रचनेच्या आराखड्यावर ठाण्यातून सुमारे दोन हजार हरकती घेण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती आल्याने निवडणूक आयोगाची डोकेदुखी वाढली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी १४२ जागांसाठी ४७ प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करून तो निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. १ फेब्रुवारी रोजी तो प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर हरकती आणि सूचना करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यावर आज १९६५ नागरिक आणि संस्थांनी हरकती घेतल्या आहेत. सर्वात जास्त ६०५ हरकती या ठाणे पूर्व भागातील आहेत. प्रभाग क्रमांक २७ आणि २८ मधील अनुक्रमे  आनंदनगर, गांधीनगर, सिद्धिविनायक नगर हे वागळे इस्टेट भागाला आणि चेंदणी कोळीवाडा, अष्टविनायक चौक साई नगरी हा भाग खारटन रोड, महागिरी कोळीवाडा या प्रभागाला जोडण्यात आला आहे, त्यामुळे येथील नगरसेवकांची संख्या कमी झाली आहे. त्याबाबत सर्वात जास्त हरकती आहेत तर दिवा येथून देखील लोकसंख्या जास्त असताना नगरसेवक संख्या कमी करण्यात आली असल्याची हरकत घेण्यात आली आहे.

अनेक प्रभागात सीमा बदल करण्यात आले आहेत. सीमांकन करताना नियम धाब्यावर बसवल्याच्या हरकती घेण्यात आल्या आहेत. २६ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग २ मार्च रोजी अंतिम आराखडा जाहीर करणार आहे. प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आल्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. हा आराखडा तयार करताना राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचा आरोप-प्रत्यारोप सेना आणि राष्ट्रवादीकडून होत असतानाच आज हरकतींचा पाऊस पडला आहे.

दिवा प्रभागातून ४००च्या पुढे हरकती आल्या आहेत. वागळे प्रभागातून २५०हून जास्त तर घोडबंदर भागातून २००च्या आसपास हरकती प्राप्त झाल्या आहेत. उथळसर प्रभागातून ४७ हरकती तर ठामपा मुख्यालयात ३००हून जास्त हरकती दाखल झाल्या आहेत. सर्वाधिक हरकती या कोपरीमधून आल्या आहेत. या हरकतींच्या पावसामुळे आयोगाची डोकेदुखी वाढणार हे निश्चित झाले आहे.