मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 5 ऑगस्टला आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदिल दिला आहे. आता त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नऊ महानगरपालिकांच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 5 ऑगस्टला आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वपूर्ण निकाल दिला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला यांच्या आरक्षित जागांसाठी ५ ऑगस्टला सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर ६ ऑगस्टला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यावर ६ ते १२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण २० ऑगस्टला प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑगस्ट २०२२ला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत त्यावर २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑगस्टला प्रारुपाच्या स्वरुपात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे आदी कामे राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यासाठी राष्ट्रीय मतदार पोर्टल म्हणजे www.nsvp.in या संकेतस्थळावर लॉगइन करून आपल्याला दुरुस्ती करता येते.