ठामपात काँग्रेसची सत्ता आल्यास ओबीसी महापौर-उपमहापौर

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा

ठाणे : ठाणे महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली तर महापौर आणि उपमहापौरपदी बहुजन समाजातील व्यक्तीला उमेदवारी देऊ असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. आगामी महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की नाही याची व्यूहरचना आताच जाहीर करण्यात येणार नाही असे स्पष्ट केले.

महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने पटोले ठाण्यात आले होते. यावेळी कॉंग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर रॅलीही काढण्यात आली होती. या रॅलीतही ते सहभागी झाले होते. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भाजपवर टीका केली. ठाणे महापालिका निवडणुकीत आघाडीबाबत आम्ही आमची भूमिका यापूर्वी स्पष्ट केली आहे. आम्ही पुन्हा चर्चा केली आहे, ते आत्ताच जाहीर करणार नाही असे स्पष्ट करून श्री. पटोले पुढे म्हणाले की, महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली तर ओबीसीचा महापौर आणि उपमहापौर बसवू असे त्यांनी जाहीर केले. अधिवेशनात लोकांच्या प्रश्न मांडले जावेत, सोडविले जावेत अशी अपेक्षा असते. मात्र भाजपची गोंधळ निर्माण करण्याची मानसिकता असेल तर तो त्यांचा भाग आहे. मात्र विरोधकांनी प्रश्न उपस्थित करावेत, सरकार उत्तरे देण्यास सज्ज असल्याचेही पाटोळे यांनी स्पष्ट केले. केंद्रातील भाजप सरकार हे कोरोनाचा काळ असेल, दुसऱ्या लाटेचा प्रभाव असेल किंवा युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेले युध्द असेल, या काळात देशाचे पंतप्रधान हे पाच राज्याच्या निवडणुकीत व्यस्त होते. त्यात मंगळवारी एका मुलाचा मृत्यु देखील झाला. येथे शिक्षणासाठी गेलेल्या इतर देशांनी त्यांचे विद्यार्थीआधीच मायदेशात आणले. मात्र मोदींना उशिराने जाग आली, असे त्यांनी सांगितले. मात्र आता उशिर झाला असला तरी देखील ही सर्व मुले सुरक्षित भारतात यावीत ही कॉंग्रेसची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. एकूणच केंद्रातील भाजप सरकार हे सत्तेचा दुरुपयोग करण्याचे काम करीत असून भाजप सर्वात मोठी भ्रष्टाचार करणारी पार्टी देशात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे यासाठी निवेदनने प्राप्त झालेली आहेत. त्यानुसार सरकाराने त्याचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर याचे परिणाम व्हावेत, यासाठी आर्यन खानवर बळजबरीने ड्रग्जचे गुन्हे दाखल केले होते. हा निवडणुकीसाठीचाच एक फंडा असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मुस्लिम आणि हिंदु वाद करुन उत्तर प्रदेशाच्या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न होता. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावरुन छेडले असता, वेळ आल्यावर त्यांच्यावर बोलेन असेही त्यांनी स्पष्ट केले. ओबीसीबाबत उद्या निकाल येणे अपेक्षित आहे. परंतु महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसची सत्ता आली तर ओबीसीचाच महापौर-उपमहापौर येथे बसेल, असा दावा त्यांनी यावेळी केला. आता ओबीसींच्या भावना जाणून घेतल्या असून हा समाज आता कॉंग्रेसच्या बाजूने उभा होत असल्याचेही त्यांनी सांगितले.