ठाणे : मोहम्मद पैगंबरांवरील वादग्रस्त विधानामुळे भाजपने निलंबित केलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स जारी करण्यात आले आहे.
२२ जून रोजी शर्मा यांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश मुंब्रा पोलिसांनी दिल्याने त्यांचा पाय अधिकच खोलात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल अपशब्द वापरले होते. त्याचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, शर्मा विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात शिक्षक मोहम्मद खान (३०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी मुंब्रा पोलीसांनी तपासला सुरवात केली. अखेर आज मुंब्रा पोलिसांनी शर्मा यांना या प्रकरणी समन्स जारी केले. २२ जून रोजी चौकशीसाठी मुंब्रा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश नुपूर शर्मा यांना देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.