आता विजेच्या खांबांवर जाहिराती लावून कमावणार अडीच कोटी

ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील विद्युत पोलवर जाहीराती झळकवण्याचे अधिकार खासगी ठेकेदाराला देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ३ हजार ८५१ विद्युत पोलवर या जाहीराती प्रसिध्द होणार आहेत. त्यापोटी पालिकेला वार्षिक अडीच कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.

महापालिकेने यापूर्वी लोकसहभागातून शहराच्या विविध भागात शौचालये उभारली आहेत. त्या शौचालयांच्या वरील बाजूस जाहीरात करण्याचे हक्क खासगी ठेकेदाराला प्रदान करण्यात आले आहेत. मात्र, शहराच्या अनेक भागात शौचालये उभारली गेली. मात्र ती सुरु न होताच जाहीराती मात्र प्रसिध्द होण्यास सुरवात झाल्याचे प्रकरण महापालिकेत चांगलेच गाजले आहे. त्यातही प्रत्यक्षात ३० पैकी ११ शौचालयांची कामे पूर्ण झालेली असून त्यातही अनेक शौचालये बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे ही योजना वादग्रस्त ठरली असतानाच पालिका प्रशासनाने आता नवीन योजना पुढे आणली आहे.

दरम्यान आता महापालिका हद्दीत असलेल्या प्रमुख विद्युत पोलवर अशाच पध्दतीने जाहीरातीचे हक्क प्रदान केले जाणार आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यावरील ३,८५१ विद्युत पोलवर जाहिरात प्रदर्शन हक्क देण्याची योजना पालिकेने तयार केली आहे. या योजनेनुसार ठेकेदाराला खांबांवर ४ बाय ६ आकाराचे जाहीरातीचे फलक उभारण्यास परवानगी दिली जाणार आहेत. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना राबविली जाणार असून या योजनेतून पालिकेला दरवर्षी अडीच कोटी
रुपयांचा महसुल मिळणार आहे. या कामाची निविदा पालिका प्रशासनाने काढली असून २३ ऑगस्टपर्यंत निविदा भरण्याची मुदत देण्यात आली आहे. परंतु आधीचे प्रकरण गाठीशी असतांना पुन्हा हा अट्टाहास कशासाठी असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.