आता शरद पवार गटाचाही जनता दरबार

ठाणे : ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत जनता दरबार उपक्रमावरून रस्सीखेच सुरू असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील जनता दरबारात उडी घेतली आहे. यातून राजकीय अर्थ काहीही निघणार असले तरी पक्षांच्या वाढत्या जनता दरबारामुळे समस्याग्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वनमंत्री गणेश नाईक, आमदार संजय केळकर यांच्या जनता दरबारानंतर शिवसेनेने देखील जनसंवाद सुरू केला असताना आता ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील जनता दरबारासाठी ठाणे महापालिका येथील सभागृहाची मागणी राष्ट्रवादीने देखील केली आहे.

शिवसेना शिंदे गट यांच्यामार्फत ठाणे महानगरपालिकेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेत जनसंवाद आयोजित केला होता. ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये राजकीय पक्षांचे दरबार चालतात यावरून राष्ट्रवादीने आक्षेप घेत स्वतःसाठीही जनता दरबार भरवण्यासाठी सभागृहाची मागणी केली आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेच्या जनता दरबारात आता राष्ट्रवादीने देखील उडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी सभागृह मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.