आता १०० ऐवजी ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर चालणार

मुंबई : सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच बँकेतून कर्ज घ्यायचे असो, सर्वसाधारणपणे नागरिकांना किमान 100 रुपयांच्या स्टँप पेपरवरुन दस्तावेज तयार करता येत होता. मात्र, यापुढे 100 आणि 200 रुपयांचे स्टँप पेपर इतिहासजमा होणार आहेत. कारण, आता किमान 500 रुपयांच्या स्टँपवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार आहे.

राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे स्टँप जारी केले जातील. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

तहसील किंवा महसूल कार्यालयात अवघ्या शंभर, दोनशे रुपयांत स्टँप केले जात. वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठेखतानंतरचे खरेदीखत, हक्क सोडपत्रासाठी आता पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे.

प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र, साठेखत केल्यानंतर पुन्हा खरेदीखत करताना ते शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी आता शंभरऐवजी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क वापरण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यामध्ये, कोणताही बदल झाला नसल्याचीही माहिती आहे.

स्थावर, जंगम मालमत्तेसाठीचा दस्तावेज

कंपन्यांच्या एकत्रीकरण, पुनर्रचना, विलिनीकरण तसेच विभागणीमध्ये विद्यमान किंवा भविष्यातील मतभेद मिटविताना लवादामार्फत लेखी निर्णय दिला जातो. कंपन्यांचे भागभांडवल मोठे असल्याने त्यांच्या स्थावर, जंगम मालमत्तेप्रकरणी अभिहस्तांतरणामध्ये सध्या पाचशे रुपये मुद्रांक शुल्क आकारणी होते. वाढीसाठी पाचशे रुपयांवरून चल व अचल मालमत्तेच्या बाजारमूल्यप्रमाणे दर बदलले जातात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना 100 आणि 200 रुपयांच्या स्टँप पेपरवर त्यांचे दस्तावेज तयार करता येत होते. आता, त्यासाठी किमान 500 रुपयांच्या स्टँपवर दस्तावेजवर बनवावे लागणार आहेत.