ठाणे : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ठामपाची प्रसुतीगृहे आता २४ तास सेवेत राहणार असून गरोदर महिला रात्री-अपरात्री कधीही दाखल झाल्यास त्यांना तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या तज्ञ डॉक्टरांमध्ये भूलतज्ञ,लहान मुलांचे डॉक्टर,जनरल मेडिसीन, रेडिओलॉजी, चेस्ट मेडिसिन तसेच फिजिओथेरपिस्ट अशा डॉक्टरांचा समावेश असणार आहे. या तज्ञ डॉक्टरांच्या पॅनलमुळे कौसा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयात विशेष सेवा सुरु करता येणार असून कळवा रुग्णालयाचा ताण देखील यामुळे कमी होणार असल्याचा दावा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत सहा प्रसूती केंद्र येत असून कौसा येथे महापालिकेच्या वतीने १०० खाटांचे रुग्णालय देखील सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयातही प्रसुती सेवा देण्याचा निर्णय आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रत्येक प्रसुती गृहामध्ये सध्या एकच वैद्यकीय अधिकारी असून २४ तास सेवा देणे शक्य नाही. पाच प्रसुती गृहांसाठी २१ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असली तरी यामध्ये सध्या केवळ १७ निवासी वैद्यकीय अधिकारीच कार्यरत आहेत.
या प्रसुती गृहांमध्ये दाखल झालेल्या आणि सिझरिंगसारख्या शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास स्त्री वैद्यकीय तज्ञ, भूलतज्ञ तसेच बालरोग तज्ञ उपलब्ध नसल्याची कबुली प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच अनेकदा अतिजोखमीच्या गरोदर मतांची तपासणी करण्यासाठी जनरल फिजिशियनची देखील आवश्यकता असून हे डॉक्टर देखील उपलब्ध नाहीत. या सर्व प्रसुती गृहांमध्ये २४ तासांत कधीही शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता पडू शकते. यासाठी आता २४ तास तज्ञ डॉक्टरांच्या पॅनलची नियुक्ती करण्याचा महत्वाचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेची कोपरी, बाळकूम, वर्तकनगर, मुंब्रा, रोजा गार्डनिया प्रसुतिगृहासह स्व. मीनाताई ठाकरे प्रसुतिगृह आणि कौसा हॉस्पिटल असून प्रस्तावित तज्ञ डॉक्टरांच्या पॅनलमध्ये १० स्त्रीरोग तज्ञ, १० भूलतज्ञ, १० बालरोग तज्ञ, चार जनरल मेडिसिन, सात रेडिओलॉजी, तीन चेस्ट मेडिसिन आणि एक फिजिओथेरपिस्ट यांचा समावेश आहे.