कल्याणमध्ये कुख्यात गुंडाची हत्या

कल्याण :  कल्याणमधील कुख्यात गुंड मुक्या उर्फ मुकेश देशेकर (३३) याची त्याच्याच मित्राने गुरुवारी रात्रीच्या सुमारास चॉपर व धारदार शस्त्राने हत्या केल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हेगार असलेला मुक्या उर्फ मुकेश याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील पोलिसांनी केली होती. तडीपारी समाप्तीनंतर मुक्या कल्याणमधील आपल्या साथीदारांना बरोबर फिरायला लागून दहशतीचे वातावरण निर्माण करू लागला होता. गुरुवारी रात्रीच्या सुमारास मुक्याचा परिचित मित्राने हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या गोदरेज हिल परिसरात चॉपर व धारदार शस्त्राने हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार हत्या घडली त्या ठिकाणी व परिसरात त्याची मोठी दहशत होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास मुक्या उर्फ मुकेश व त्याचा परिचित मित्रामध्ये बाचाबाची झाल्याने आपल्या जवळील हत्याराने सपासप वार करीत त्याची हत्या करण्यात आली. खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी या घटनेला दुजोरा दिला असून हत्या करणारा त्याचा मित्र असल्याचे निष्पन्न झाले असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल अशी माहिती दिली.