धोकादायक इमारतींना नोटीसा; पुनर्विकासाला दाखवला ठेंगा

* क्लस्टरमुळे इकडे आड तिकडे विहीर
* रस्त्यावर उतरण्याचा आमदार संजय केळकर यांचा इशारा

ठाणे : एकीकडे धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या जात आहेत तर दुसरीकडे क्लस्टरच्या नावाखाली पुनर्विकासाला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे रहिवाशांची इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली असून रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतला असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

क्लस्टर योजनेतून कोळीवाडे आणि गावठाण भाग वगळण्याची घोषणा करण्यात आलेली असताना या भागात पुनर्विकासाला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे क्लस्टर योजनेचा मूळ उद्देश दूर जात असून ही योजना बिल्डरधार्जिणी झाल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

यशस्वी नगरमध्ये १८ इमारतींना स्वतःचा सात-बारा असून येथील धोकादायक इमारतींना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत मात्र दुसरीकडे या इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगी दिली जात नसल्याने येथील रहिवाशांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

अधिवेशनात मिनी क्लस्टर योजना तयार करण्याची मागणी मी केली असून काही सूचनाही केल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशीही प्रत्यक्ष चर्चा झाली आहे. मोठ्या क्षेत्रफळांचे आराखडे तयार करण्यात आल्याने एसआरए प्रक्रिया सुरू झालेल्या भागांनाही अनावश्यक असताना समाविष्ट केले जात असून रहिवाशांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे. मिनी क्लस्टर योजना केल्यास या त्रुटी दूर होतील, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

क्लस्टर योजनेचे ठाणे शहरात ४४ आराखडे तयार करण्यात आले असून त्यापैकी अद्याप एकाही आराखड्यावर काम सुरू झालेले नाही. तातडीने योजना राबवण्याची गरज असतानाही किसननगरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे एक ना धड भराभर चिंध्या, अशी अवस्था झाल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.