ठाणे : इर्शाळवाडीप्रमाणे ठाण्यासारख्या शहरी भागात आजही डोंगरपट्ट्यात हजारो कुटुंबे आपला जीव धोक्यात घालून राहत आहेत. आता इर्शाळवाडीच्या घटनेची पुनरावृत्ती ठाण्यात होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेने कळवा तसेच मुंब्र्यातील डोंगर पट्ट्यात राहणाऱ्या ७२५ घरांना नोटीस देऊन त्यांना स्थानांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपासवरील मुंब्रा देवी परिसरात भुस्खलन झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी देखील ठाणे महापालिका आणि वनविभागाने खरबदारी घेत येथील ४५ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. दुसरीकडे येथे अतिजोखीमीच्या भागात असलेली नऊ घरे सील करण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.
आता उशिरा का होईना ठाणे महापालिकेला अखेर जाग आली असून पालिका प्रशासनाने कळवा आणि मुंब्रा भागातील दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे.आतापर्यंत येथील ७२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात कळव्यातील ५०० हून अधिक आणि मुंब्रा बायपासवरील २२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच घरोघरी जाऊन येथील रहिवाशांना सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. किमान पावसाळ्यापर्यंत तरी दुसरीकडे रहावे असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
दुसरीकडे वनविभागाने देखील आता भूस्खलनाच्या घटनेनंतर कळवा-मुंब्रा भागातील घोलाई नगर, आतकोनेश्वर नगर, कारगिल कोंडा आदी भागात पावसाचा जोर लक्षात घेत सर्तक राहण्याच्या सुचना करणारे फलक लावले आहेत. तसेच येथील ८ ते १० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.