दिव्याचे सांडपाणी विनाप्रक्रिया खाडीत
ठाणे: मागील दहा वर्षात ठाणे महापालिकेने नवीन एकही सांडपाणी (मलनिस्सारण) प्रक्रिया केंद्राची निर्मिती केली नाही, अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडे दिवा भागातील चार प्रक्रिया केंद्राची फाईल मंजुरीच्या प्रतिक्षेत असून या परिसरातील सांडपाणी खाडीत सोडले जात आहे.
ठाणे महापालिकेला हरित लवादाने नुकताच १०२ कोटींचा दंड ठोठावला आहे. मुंब्रा भागातील एका जागरूक ठाणेकराने मुंब्रा खाडीत सोडण्यात येणारे सांडपाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सोडले जात आहे, त्यामुळे जलप्रदूषण होत असल्याची तक्रार हरित लावादाकडे केली होती. त्या प्रकरणावर सुनावणी सुरु असताना महापालिकेने मागिल दहा वर्षात एकही नवीन प्रक्रिया केंद्र बांधले नसल्याचे समोर आले आहे.
ठाणे शहरात १८४ छोटया-मोठ्या प्रक्रिया केंद्रांमार्फत ८०टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. ते प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडले जात असल्याचा दावा महापालिकेने हरित लवादापुढे केला होता, परंतु दिवा, शीळ, दातीवली या भागातील ३२ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते पाणी खाडीत सोडले जात असल्याने खाडीचे पाणी प्रदूषित होत असल्याचा दावा तक्रारदार यांनी केला होता. या भागातील नऊ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे महापालिकेचे म्हणणे लवादाने फेटाळून लावले.
या भागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महापालिकेने दोन वर्षांपूर्वी अमृत योजनेतून मुंब्रा, दिवा, शीळ, दातीवली या भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार केंद्रे उभारण्याचा ७०० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीकरिता पाठवला होता, परंतु त्याला केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली नाही तसेच या भागात केंद्र उभारणीसाठी कोणीही भूखंड देत नसल्याने वेगवेगळे पर्याय महापालिकेने सुचवले होते. त्याला देखील हरित लवादाने मान्यता दिली नाही, त्यामुळे या भागात मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रच नसल्याने सांडपाणी खाडीत सोडले जात आहे. परिणामी मुंब्रा खाडी प्रदूषित होत आहे. ही प्रक्रिया केंद्रे उभी राहतील, तेव्हा खाडीचे प्रदूषण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.