स्टॅव्हंगर (नॉर्वे) ; भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत विजयी पुनरागमन करताना पारंपरिक (क्लासिकल) विभागातील पाचव्या फेरीत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनवर सरशी साधली. या विजयासह आनंदने गुणतालिकेतील अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे.
आनंदने गेल्या आठवडय़ात या स्पर्धेच्या अतिजलद (ब्लिड्झ) प्रकारातील सातव्या फेरीत कार्लसनवर मात केली होती. त्यापाठोपाठ पारंपरिक विभागातही आनंदला नॉर्वेच्या तारांकित खेळाडूचा पराभव करण्यात यश आले. आनंद आणि कार्लसन यांच्यातील पाचव्या फेरीची नियमित लढत ४० चालींअंती बरोबरीत संपली. त्यानंतर बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या अर्मागेडन डावात आनंदने दर्जेदार खेळ करताना ५० चालींमध्ये विजयाची नोंद केली.
या विजयामुळे आनंदच्या खात्यावर एकूण १० गुण झाले असून चार फेऱ्या शिल्लक असताना त्याने गुणतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे. ५२ वर्षीय आनंदने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याला पारंपरिक विभागातील पाचपैकी चार सामने जिंकण्यात यश आले आहे. त्याने आतापर्यंत मॅक्सिम वाशिये-लॅग्रेव्ह (फ्रान्स), व्हेसेलिन टोपालोव्ह (बल्गेरिया), हाओ वांग (चीन) आणि कार्लसन यांच्यावर मात केली आहे. केवळ चौथ्या फेरीत त्याला अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
तसेच पाचव्या फेरीत पराभव झाला असला, तरी कार्लसन ९.५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. अझरबैजानचा शख्रियार मामेदेरोव्ह आणि वेस्ली सो संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर असून दोघांच्या खात्यावर प्रत्येकी ८.५ गुण आहेत. या दोघांमध्ये झालेल्या पाचव्या फेरीच्या लढतीत मामेदेरोव्ह विजयी ठरला. त्याचप्रमाणे वाशिये-लॅग्रेव्हने टोपालोव्हला पराभूत केले.
आनंदच्या दावेदारीला ‘एआयसीएफ’चा पाठिंबा
नवी दिल्ली : जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) उपाध्यक्षपदासाठी विश्वनाथन आनंदच्या दावेदारीला अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) पाठिंबा दर्शवला आहे. शुक्रवारी काही अज्ञात व्यक्तींचे ई-मेल समोर आले होते, ज्यात ‘एआयसीएफ’चे माजी सचिव भरत सिंग चौहान हे ‘फिडे’च्या उपाध्यक्षपदासाठी जास्त योग्य उमेदवार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ‘एआयसीएफ’चे प्रभारी सचिव विपनेश भारद्वाज यांनी आपला आनंदला पूर्व पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.