Thanevaibhav Online
22 September 2023
ठाणे : दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या वेळी ठाण्यात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषणाची नोंद करण्यात आली असून एकट्या मासुंदा तलाव परिसरात ध्वनिप्रदूषणाने शंभरी गाठली आहे.
तलावपाळी परिसरात ढोल ताशे, डीजे आणि बेंजोच्या आवाजाने १०० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाची नोंद झाली आहे. तर ठाण्याच्या मुख्य ठिकाणी देखील ध्वनी प्रदूषणाची पातळी ७० ते ९० डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे.
ढोल-ताशांचा कडकडाट, बेंजो, डीजे आणि फटाक्यांची आतषबाजी अशा कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे यंदा दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान शंभर डेसिबल आवाजाची पातळी गाठली आहे.
शहरातील मुख्य रस्ता असलेल्या गोखले मार्गावर रात्री साडेआठ वाजता ९० तर राम मारुती मार्गावर साडेनऊ वाजता ९५ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी ढोल-ताशा पथक, बेंजो आणि स्पीकरमुळे आवाजाचा स्तर उच्च होता. तर पाचपाखाडी येथील पालिका मुख्यालयासमोर असलेल्या कचराळी तलावाजवळ रात्री दहा वाजता कर्णकर्कश वाद्यांमुळे ८५ ते ९० डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली.
लोकमान्यनगर, सावरकरनगर, समतानगर, यशोधननगर, महात्मा फुलेनगर येथील विविध गणेशमूर्तींचे विसर्जन उपवन येथील कृत्रिम तलावात केले जाते. या तलावाकडे जाणारा मार्ग वर्तकनगर येथून जातो. याठिकाणी तुलनेने सर्वात कमी ७० डेसिबल आवाजाची नोंद झाली. रात्री सव्वादहा वाजता ही नोंद करण्यात आली.
मासुंदा तलाव परिसरात उशिरा रात्री सव्वा बारा वाजता ९० डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. त्याआधी ११ वाजता याठिकाणी ९५ ते १०० डेसिबल आवाजाची नोंद सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केली. उशिरा रात्रीपर्यंत सुरु असलेल्या या आवाजी धिंगाण्याने या भागातील नागरिक हैराण झाले होते.
ध्वनिप्रदूषणाची झालेली नोंद
परिसर वेळ (रात्री) डेसिबल
गोखले मार्ग ८.३० ९०
राम मारुती मार्ग ९.३० ९०-९५
तलावपाळी ११ ९५-१००
तलावपाळी १२: १५ ९०