अंबरनाथला गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांचा इशारा
अंबरनाथ : गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याचे पाणी, चांगले रस्ते आणि अनियमित वीजपुरवठ्याने त्रस्त झालेल्या एका सोसायटीतील रहिवासींनी ‘नो वॉटर-नो वोट’चा इशारा दिला आहे.
अंबरनाथच्या पश्चिमेला असलेल्या पटेल प्रियोषा योगिनीवास गृहनिर्माण सोसायटीमध्ये १२ इमारतींमध्ये ४७० फ्लॅट असून दीड हजार नागरिक रहात आहेत. २०१६ पासून गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाण्याची टंचाई जाणवते, सध्याच्या घडीला एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तीन दिवस पाणी पुरवून वापरले जाते, पाण्याच्या वेळाही अनियमित आहेत. त्यामुळे महिला वर्गाला प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. कायमच्या पाणीटंचाईमुळे सणाच्या दिवशी पाहुण्यांना सुद्धा घरी येताना विचार करावा लागतो. पुरेसे पाणी मिळावे, रस्ता आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजेच्या पुरवठ्यात सुधारणा करावी, नियमित कचरा उचलला जात नाही. या समस्यांना रहिवाशांना तोंड द्यावे लागते. या समस्यांची सोडवणूक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले तर निवडणुकीत मतदान करण्याचा निर्णय घेऊ. अन्यथा नाईलाजाने निवडणुकीवर बहिष्कार टाकावा लागेल, असा इशारा गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने कृती समितीचे ए. टी. सॅबस्टिन यांच्या नेतृत्वाखालील महिला आणि पुरुष रहिवासीयांनी इशारा दिला.
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा करूनही समस्यांची सोडवणूक झाली नसल्याने अखेरीला ‘नो वॉटर-नो वोट’चा निर्णय घेतल्याचे सॅबस्टिन यांनी सांगितले.