करवाढ नाही आणि नवीन प्रकल्पही नाहीत

ठाणे महापालिकेचा ३,२९९ कोटींचा अर्थसंकल्प

ठाणे : कोणत्याही प्रकारची करवाढ न करता काटकसर करणारा यंदाचा अर्थसंकल्प ठामपा आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी सादर केला. ३,२९९ कोटींचा हा अर्थसंकल्प असून कोणतेही नवीन मोठे प्रकल्प हाती घेण्यात आलेले नाहीत.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ होणार नाही हे अपेक्षितच धरण्यात आले होते. त्याचप्रमाणे हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून विशेष म्हणजे यावर्षी देखील एकही मोठ्या नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली नसली तरी ठाणेकरांना सुविधा आणि मनोरंजन देण्याच्या दृष्टीने २५ नवीन योजनांचा समावेश यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.

मागील दोन वर्षात कोरोना या महाभयंकर विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जागतिक स्तरावर महामारी घोषित करण्यात आली. त्याचा परिणाम सर्व उदयोगधंदे, व्यवसाय व रोजगारावर झाल्यामुळे महापालिकेसही अपेक्षित असलेले कर, दर व शुल्कापोटी काही बाबींचा अपवाद वगळता उर्वरित बाबींपासून अपेक्षित महसुल प्राप्त झाला नाही. परिणामी महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली.

सन 2021-22 चे मूळ अंदाजपत्रक हे 2755 कोटी 32 लक्ष रकमेचे तयार करण्यात आले होते. यामध्ये काही विभागांकडून अपेक्षित केलेले उत्पन्न साध्य होत नसले तरी शहर विकास विभागाकडून अपेक्षित उत्पन्नापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तसेच शासनाकडून क्लस्टर योजना, पंधरावा वित्त आयोग, पायाभूत सुविधा अंतर्गत अनुदान तसेच माझी वसुंधरा अंतर्गत बक्षिस रक्कम इत्यादीचा विचार करता सुधारित अंदाजपत्रक 3510 कोटी रकमेचे तयार केले आहे व सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 3299 कोटींचा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

अर्थसंकल्पात काय आहेत तरतुदी?

तलाव सुशोभीकरणासाठी १० कोटी, जांभळी नाका मार्केट पुनर्विकासाठी पाच कोटी, पार्किंग सुविधांचे जाळे निर्माण व भूमिगत वाहनतळासाठी १० कोटी, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती व अद्यावतीकरणासाठी २६ कोटी, शहर सौदर्यींकरणासाठी १५५ कोटी, शाळा परिसरात सुरक्षा उपाय योजनेसाठी १० कोटी, अर्बन डेन्स फॉरेस्ट्रीसाठी पाच कोटी, थीम पार्कसाठी दोन कोटी, फिल्म इन्स्टिटयूटसाठी पाच कोटी, रस्ते सुरक्षा आणि फुटपाथसाठी १० कोटी, पाणी पुरवठा विस्तार व मजबुतीकरणासाठी ५० कोटी, वाहतुक नियमन उपाययोजना १० कोटी, रस्त्यांच्या कामांसाठी २६० कोटी अशा कामांचा समावेश आहे.

सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 107 कोटी 67 लक्ष अनुदान अपेक्षित होते. डिसेंबर 2021 अखेर 322 कोटी 15 लक्ष अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने क्लस्टर योजनेसाठी 149 कोटी, पंधराव्या वित्त आयोगाकडून 24.15 कोटी व हवा गुणवत्ता अनुदानापोटी 48.30 कोटी , माझी वसुंधरा अंतर्गत बक्षिस .5 कोटी ही अतिरिक्त अनुदाने प्राप्त झाल्याने सुधारित अंदाजपत्रकात 342 कोटी 97 लक्ष अपेक्षित केले असून सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 111 कोटी 70 लक्ष अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे.

आजमितीस महापालिकेवर 142 कोटी 71 लक्ष कर्ज शिल्लक आहे. सन 2021-22 तसेच सन 2022-23 च्या अंदाजपत्रकात कर्ज अपेक्षित केलेले नाही.अशा प्रकारे सन 2021-22 मध्ये आरंभिची शिल्लक 260कोटी 64 लक्षसह सुधारित अंदाजपत्रक 3510 कोटी व सन 2022-23 मध्ये आरंभिची शिल्लक 250 कोटी 76 लक्षसह मूळ अंदाज 3299 कोटी प्रस्तावित करण्यात आला आहे.

कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत वैद्याकीय सेवा व सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करावा लागत असल्याने विकास कामांसाठी निधी अपुरा आहे याची आपणा सर्वांनाच कल्पना आहे.सन 2021-22 मध्ये महसुली खर्चासाठी 1819 कोटी 61 लक्ष खर्चाचे अंदाज प्रस्तावित होते. या आर्थिक वर्षात महसुली खर्चाच्या काही प्रमुख बाबींवर सुधारित अंदाजपत्रकात तरतुदी वाढवून देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोरोना नियंत्रण उपाय योजनेसाठी 223 कोटी, पाणी खरेदीसाठी 44 कोटी तसेच परिवहन सेवेसाठी 76 कोटी इत्यादीचा समावेश आहे. त्यामुळे सुधारित अंदाजपत्रकात महसुली खर्च 2140 कोटी 23 लक्ष करण्यात आले आहे. भांडवली खर्चासाठी 935 कोटी 37 लक्ष तरतूद प्रस्तावित होती. भांडवली खर्चाच्या काही बाबींमध्ये कपात केली असून नगरसेवक निधी स्पील ओव्हरसाठी, प्रभाग सुधारणा निधी स्पील ओव्हर तसेच या आर्थिक वर्षासाठी काही रक्कम , मागासवर्ग निधीमध्ये स्पील ओव्हरसाठी वाढ करण्यात आली असून भांडवली खर्च 1119 कोटी 1 लक्ष करण्यात आला आहे.

क्लस्टरसाठी १४९ कोटी

ठाणेकरांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या क्लस्टर योजनेला देखील यंदाच्या अर्थसंकल्पात महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. यासाठी तब्बल १४९ कोटींची भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. नुकतेच संक्रमण इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणापासून ५०० मीटर अंतरावरच बाधितांना संक्रमण शिबिरे बांधून देण्यात येणार आहेत.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांवर ठाणे महापालिकेने आतापर्यंत २३० कोटी रुपये खर्च केला आहे. दुसरीकडे कोरोनाची लाट सध्या ओसरली असली तरी, पुन्हा ही लाट येणार नाही असे कोणीच सांगू शकत नसल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात कोरोनासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीही कोरोनासाठी ८१ कोटींची तरतूद करण्यात आली होती.

दायित्व कमी करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत ६२० कोटी बिले अदा करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी दिली आहे. ठाणे मागील वर्षी पर्यंत ८५० कोटींची बिले अदा करणे बाकी होते. मात्र ३१ मार्च पर्यंत ६२० कोटी देण्यात येणार असून यामधून २०१९-२० पर्यंतची १०० टक्के बिले अदा करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मागील पाच वर्षातील अर्थसंकल्प (कोटींमध्ये)

वर्ष            अर्थसंकल्प

2022-23-      3299

2021-22 –     2755

2020-2021   3780

2019-20:      3861

2018-19:      3695.13

2017-18:       3390

आयुक्तांची बदली करा-काँग्रेस

ठाणे : ठाणे महानगरपालिका अर्थसंकल्पाची गोपनीयता न राखली गेल्यामुळे प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त यांचेकडून गोपनीयता राखली गेलेली नसल्यामुळे प्रशासनावर त्यांचा अंकुश राहिलेला दिसून येत नाही. याकरीता या आयुक्तांची ठाणे महानगरपालिकेमधून अन्य ठिकाणी बदली करण्यात यावी, अशी मागणी ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी (आय) चे अध्यक्ष तथा ठाणे महापालिका स्थायी समिती सदस्य विक्रांत चव्हाण व स्थायी समिती सदस्य सुहास देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

सभा सूचना क्र. 1 दिनांक 4.2.2022 अन्वये ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प सादरीकरणाबाबतची स्थायी समितीची विशेष सभा आज गुरुवार दि. 10.2.2022 रोजी ठाणे महापालिका भवनातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात वेबिनारद्वारे आयोजित करण्यात आली होती. तथापि सदर सभेमध्ये आयुक्त यांनी अर्थसंकल्पाबाबत सादर केलेले निवेदन हे आदल्या दिवशीच प्रसिध्दीमाध्यमाकडे पोहोचले व आज रोजीच्या दैनिक वृत्तपत्रांत त्याबाबत छापून देखील आलेले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून अर्थसंकल्पाबाबतची गोपनीयता राखली गेलेली नाही हे स्पष्टपणे दिसून येते व ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. वस्तुस्थिती पाहता आम्ही स्थायी समिती सदस्य असताना आज रोजी सकाळपर्यंत आम्हांला बजेट पुस्तिकेची प्रत मिळालेली नाही. मात्र ती बजेट पुस्तिका वृत्तपत्रांना कशी पोहोचली असा सवाल या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाचे निर्देशाप्रमाणे स्थायी समितीची विशेष सभा वेबिनारद्वार आयोजित करण्यात आली व स्थायी समितीच्या 16 सदस्यांना प्रत्यक्ष सभेस उपस्थित राहण्यापासून वंचित करण्यात आले. परंतु ज्या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती त्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्रत्यक्षात शंभरपेक्षा जास्त जनसंख्या असल्याचे दिसून आले. तरी अर्थसंकल्पाची गोपनीयता न राखली गेल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरकारवाई करण्यात यावी तसेच प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांची अन्य ठिकाणी बदली करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

कोट्यवधींचा भ्रष्टाचार, पण धरणासाठी पैसे नाहीत-डुंबरे 

‘जुने ठाणे नवीन ठाणे’ ‘बॉलीवुड पार्क’ या प्रकल्पात कोट्यवधी रुपये वाया गेले. मात्र, ठाणे महापालिकेला अजूनही शहाणपण आलेले नाही. ठाणे शहरातील नागरिकांना पिण्याचे पुरेसे पाणी पुरविण्यातही महापालिका अपयशी ठरत असताना थीम पार्कसाठी वाढीव तरतूद व फिल्म इन्स्टिट्यूट उभारण्याचा प्रस्ताव संतापजनक आहे. या प्रस्तावातून एखाद्या बॉलीवूड निर्मात्याची सोय लावण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा संशय येतो. तब्बल ४० वर्ष महापालिकेच्या स्थापनेला होत असताना स्वतंत्र धरणासाठी यंदाच्याही अर्थसंकल्पात काहीही सुतोवाच नाही, ही शोकांतिका आहे, अशी टीका भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

ठामपा आयुक्तांची विश्वासार्हता संपली-अविनाश जाधव

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प फुटल्याने संतप्त झालेल्या मनसैनिकांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली थेट ठामपा आयुक्तांच्या दालनात धडक मारून जाब विचारला. यावेळी अविनाश जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी केली.

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी छापण्यासाठी गेला होता, मग तो फुटला कसा असा सवाल यावेळी जाधव यांनी उपस्थित केला. एकीकडे डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणे महापालिकेचा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्या पासून घोटाळासत्र सुरू झाले आहे, तर दुसरीकडे अतिरिक्त आयुक्त गाण्याच्या कार्यक्रम करून चाटेगिरी करत असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी यावेळी केला. कोरोना काळात घोटाळा, प्रभाग रचना, अर्थसंकल्प फुटी प्रकरण यामध्ये आयुक्त जबाबदार असून दबावाखाली काम करत आहेत. अर्थसंकल्पावर उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्याची विश्वासार्हता संपली असल्याचे यावेळी जाधव यांनी सांगितले.