मिरा-भाईंदर शहर उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाणार : आयुक्त
भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेचा आगामी वर्षाचा पर्यावरण पुरक अर्थसंकल्प तयार करण्यात आला असून या महानगरपालिकेत पहिल्यांदाच पर्यावरण विभागाची मुहूर्तमेढ रोवण्यात आलेली आहे. इतकेच नव्हेतर ठाणे महानगरपालिकेच्या धर्तीवर मिरा-भाईंदर शहर हे उद्यानाचे शहर म्हणून ओळखले जावे, यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून गतवर्षीपेक्षा उत्पन्नात 20 टक्क्याहून अधिकची वाढ अपेक्षिलेली असल्याची घोषणा आयुक्त दिलीप ढोले यांनी एका भरगच्च पत्रकार परिषदेत आज केली आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा सन 2022-23 चा 1817 कोटी 90 लक्ष 75 हजाराचा अर्थसंकल्प आयुक्त दिलीप ढोले यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत या समितीचे सभापती राकेश शाह यांना सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प 30.50 लक्ष इतक्या शिल्लकीचा असून गतवर्षापेक्षा महानगरपालिकेच्या उत्पन्नात विविध मार्गाने 20.45 टक्के इतकी वाढ अपेक्षिली आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना आयुक्त दिलीप ढोले यांनी हा अर्थसंकल्प पर्यावरणपुरक अर्थसंकल्प असून याकरीता स्वतंत्र पर्यावरण विभागाची स्थापनादेखील करण्यात आलेली आहे. या विभागासाठी महानगरपालिकेने 01 कोटीची तरतदू केलेली असून राज्य शासनाने 21 कोटी मंजूर केले आहेत. त्याचप्रमाणे ठाणे महानगर जसे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते, त्याच धर्तीवर मिरा-भाईंदर शहर उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जावे, हे उद्दीष्ट बाळगून त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. या शहरात एकूण 73 उद्याने असून उद्याने आणी मैदाने यांची माहिती नागरीकांना उपलब्ध व्हावी, याकरीता स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. उद्यानांच्या आरक्षित जागी कुणी अतिक्रमण केले असल्यास संबंधितांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभरात साजरे होत असून या शहरातील घोडबंदर येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या विकासाकरीता 07 कोटी रूपयांची तर किल्ले धारावी जंजिरे या किल्ल्याच्या विकासाकरीता पहिल्यांदाच 02 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहराचे सुशोभीकरण आणि सौदर्यीकरण याकरीता 05 कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती ढोले यांनी दिली आहे.
दिव्यांगांसाठी स्वतंत्र शाळा आणि आरोग्य सुविधा व फिजियोथेरेपी याकरीता 3.75 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पावसाळ्यापुर्वीच्या नालेसफाईकरीता 3.50 कोटींची तरतूद करण्यात आलेली असून शहरातील साफसफाईसाठी संपुर्ण शहराकरीता 140 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मिरा-भाईंदर शहरात रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते, अशी स्थिती निर्माण झालेली असतानाच या शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून याकरीता येत्या पाच वर्षात 1000 कोटींचा खर्च अपेक्षित असून चालू आर्थिक वर्षात 110 कोटींची तरतूद प्रथमत: करण्यात आल्याची घोषणा आयुक्त ढोले यांनी केली आहे.
मिरा-भाईंदर शहराला सातत्याने कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या शहराला मुबलक पाणी पुरवठा करणारी सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार असून याकामी महानगरपालिकेने अंतर्गत जलवाहिन्यांकरीता 68 कोटींची तरतूद केलेली आहे. तर या शहरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरीता विविध ठिकाणी 08 प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असून त्यापैकी 02 बायोगॅस प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. याकामी 71.25 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
हेरीटेज वॉक संकल्पना :- मिरा-भाईंदर शहराला ऐतिहासिक महत्व असून शहराचा-बंदरांचा सुमारे 400 वर्षापुर्वीचा इतिहास आहे. या शहरातील घोडबंदर व धारावी जंजिरा किल्ला 18 व्या शतकात पेशवे चिमाजी अप्पांनी जिंकले होते. शहरातील किल्ले, उद्याने, पर्यटन स्थळे आणि चौपाटी येथील नागरीकांना सफर करता यावी, याकरीता हेरीटेज वॉक संकल्पना राबविण्यात येणार असून यासाठी 20 सिट्सची एक आधुनिक पर्यटन बस उपलब्ध केली जाणार आहे.
परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच परिवहन सेवा पर्यावरण पुरक असावी, याकरीता 50 इलेक्ट्रिक प्रवासी बसेसची खरेदी करण्यात येणार असून याकरीता 08 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सुधारणा करण्याकरीता 21 कोटींची तरतूद करण्यात आलेली असून यामध्ये सोलर उर्जा, सायकल ट्रॅक, प्रदुषण नियंत्रण करणारी मशीन, फिरती प्रयोगशाळा इत्यादी खरेदी करण्यात येणार आहे.
अग्निशमन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी ALP (Areal Ladder Platform) 90 मिटर्स अग्निशमनचे नविन वाहन या वर्षातच खरेदी करण्यात येणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शहरात सी.सी.टि.व्ही. बसविले जाणार असून याकरीता 07 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
महानगरपालिकेच्या शालेय शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात 5 ते 8 वी पर्यंत सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्यात येणार असून शिक्षण विभागाकरीता 29.31 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तर राज्य व देश पातळीवर शहरातील मुलामुलींच्या खेळाचा दर्जा वाढविण्याकरीता अर्थसंकल्पात क्रिडा विभागाअंतर्गत 1.35 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच महिला व बालकल्याणचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तसेच त्यांना शिक्षण व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 5.50 कोटींची तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेने उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार केले असून यामध्ये सांडपाणी पुर्नवापरचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या माध्यमातून 05 कोटी रूपयांचे उत्पनन अपेक्षिलेले आहे.
कर व दरवाढ नाहीच
आगामी मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुक ऑगस्ट महिन्यात होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची कर अथवा दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.