रस्ता नाही तर मतदान नाही

रुस्तमजी अर्बेनियाच्या रहिवाशांचा इशारा

ठाणे : ठाण्यातील रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलनातील रहिवाशांना आराखड्यानुसार रस्ता उपलब्ध करून दिला जात नसल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून संकुलानात यावे लागते. यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असल्याने रहिवाशांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

ठाण्यातील साकेत पूलाजवळ रुस्तमजी अर्बेनिया नावाचे गृहसंकुल आहे. या गृहसंकुलामध्ये सुमारे २५ ते ३० मजल्यांच्या अनेक इमारती आहेत. घोडबंदरच्या तुलनेत ठाणे स्थानक, मुंबई नाशिक महामार्गापासून जवळचा भाग असल्याने २०१४ नंतर अनेकजण या गृहसंकुलामध्ये वास्तव्य करण्यास आले. सध्या या भागात साकेत कॉम्प्लेक्स आणि रुस्तमजी अर्बेनिया या दोन्ही गृहसंकुलाच्या सुमारे पाच हजार सदनिकाधारक असून सुमारे २० ते २५ हजार नागरिक या भागात वास्तव्य करतात. या भागातून एक सेवा रस्ता माजिवडा आणि राबोडीला जोडणारा केला जाणार आहे, असे सदनिका खरेदी करताना अनेकांना बांधकाम व्यवसायिकांच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मुंबई-नाशिक महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांना गृहसंकुलाचा रस्ता जोडला जात असल्याने तसेच ठाण्यापासून जवळचा भाग असल्याने अनेकांनी कोट्यवधी रुपये मोजून येथील गृहसंकुलामध्ये सदनिका खरेदी केल्या. येथे मोठ्या प्रमाणात रहिवासी वास्तव्यास येऊ लागल्याने ठाणे महापालिकेने ठराव केला होता. या ठरावानुसार, साकेत ते ऋतु इस्टेटचा १५ मीटर रुंद सेवा रस्ता तयार करण्याचे ठरले होते. हा विकास आराखड्यानुसार रस्ता तयार केला जाणार होता. मान्यता मिळून सुमारे आठ वर्ष उलटल्यानंतरही सेवा रस्ता तयार करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल प्रशासनाकडून झालेली नाही. येथील नागरिकांनी एकत्र येत ‘रस्ता नाही तर मतदान नाही’ अशी भूमिका घेतली आहे.