ठाणे : दडपणाखाली शिक्षकांच्या हातून अपेक्षित काम होऊ शकणार नाही. त्यांना पुरेसा आदर मिळायला हवा आणि त्यासाठी शिक्षकांनी आपल्या कर्तव्याच्या कक्षा वाढवाव्यात, असे मत ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केले.
अंबरनाथ येथील रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीतर्फे आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड कार्यक्रमात श्री. बल्लाळ बोलत होते. त्यांच्या हस्ते आठ गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षक हे भीतीच्या सावटाखाली वावरत असून ज्या विकृत घटना घडल्या त्याबद्दल निषेध करून थांबता येणार नाही. त्यासाठी कृतीशील कार्यक्रम घेऊन हे संकट थोपवायला हवे. यात पालकांचे सहकार्य मिळवणे निकडीचे आहे, असेही श्री. बल्लाळ म्हणाले.
रोटरी अंबर भवन, खेर सेक्शन अंबरनाथ येथे रोटरी इंडिया लिटरसी मिशन या उपक्रमांतर्गत नेशन बिल्डर अवॉर्ड २०२४ या सोहळ्याचे आयोजन रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘ठाणेवैभव’ संपादक मिलिंद बल्लाळ उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध शाळांमधील आठ शिक्षकांचा त्यांच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. माधवी धांडे, सुरेश वाळके, माणिक पाटील, तेनाली जॉर्ज, सचिन कर्टुले, तनुजा रोंगटे, विलास गवारी आणि गणेश फसाळे या मान्यवर शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लबच्या प्रथम महिला पल्लवी पाटकर, सोनाली कोठावदे यांनी केले. क्लबचे अध्यक्ष संदीप पाटकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच रोटरी या संस्थेबद्दल थोडक्यात माहिती करून दिली.
क्लबचे माजी अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी रोटरी इंडिया लिटरसी मिशन बद्दल थोडक्यात माहिती दिली. सर्व शिक्षकांनी सत्काराला उत्तर देताना रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच सर्व रोटरी सदस्यांचे आभार मानले.
प्रकल्प प्रमुख अरुण पिल्ले यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. श्री. बल्लाळ यांनी सर्व सत्कारमूर्ती शिक्षकांचे अभिनंदन करून सर्व शिक्षकांच्या कष्टाचे व विद्यार्थ्यांमधून उद्याचा संस्कारक्षम नागरिक घडविण्याच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. भविष्यात शिक्षकांपुढील असणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करावे लागेल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
मधु यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमासाठी क्लबचे माजी अध्यक्ष शीतल जोशी, विशाल ठोंबरे, गोकुळ पाटील, जयेश वराडे तसेच सचिव सुशांत कोठावदे, खजिनदार नवनाथ शेळके, सदस्य बाबासाहेब गिड्डे, संजीवनी काटकर, उमेश वाणी, कैलास फलके, चंद्रकांत खैरनार, सचिन भिवपाठकी, आनंद वैयापुरी आदी उपस्थित होते.