नाही मनी, नाही मसल पॉवर; ठाकरे गटाची वाट खडतर

आनंद कांबळे/ठाणे

ठाण्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या ठाकरे याच्या शिवसेनेची वाट अधिकच खडतर असून आगामी महापालिका निवडणुकीत त्यांना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे.

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर ठाणे महापालिकेसह जिल्ह्यात ठाकरे गटाला अस्तित्वासाठी धडपड करावी लागत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेत मनी, मसल पॉवरमध्ये ठाकरे गट कमकुवत ठरत आहेच, पण सक्षम नेतृत्वाचा अभावही या पिछेहाटीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये ‘किमान’ नगरसेवक निवडून आणण्याचे ’कमाल’ आव्हान शिवसेना ठाकरे गटासमोर असणार आहे.

ठाण्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पहिली सत्ता दिली. बाळासाहेबांना मानणारा कट्टर शिवसैनिकांच्या साथीने तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी शिवसेना जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहचवली, रुजवली. त्यामुळे एकेकाळी संघाचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यावर शिवसेनेने आपली पकड निर्माण केली. भाजपच्या हातातून लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महापालिका हिसकावून एकप्रकारे वादळ निर्माण केले. त्यामुळे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होता परंतु
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले होते. सुरुवातीच्या काळात कार्यकर्ता मात्र तटस्थ राहिला. त्यामुळे ठाणे नेमके कुणाचे हे दाखवण्याची पहिली संधी मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळाली. पण ठाकरे गटाकडे असलेले एकमेव खासदार राजन विचारे यांना अतिआत्मविश्वास नडला आणि पराभवाला सामोरे जावे लागले. यातूनही ठाकरे गटाच्या विशेष नेतृत्वाने धडा घेतला नाही. लोकसभेत पराभव झाला तरी मिळालेल्या मतांच्या बिदागीवर जिल्ह्यात ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीत दहा नवीन चेहर्‍यांना संधी दिली. त्यापैकी चार ठिकाणी हे शिलेदार आघाडीवर होते. पण पुन्हा नेतृत्व, मनी, मसलमध्ये ठाकरे गट अपुरा पडला. उलट ज्या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार कमकूवत होते, तेथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्वशक्ती पणाला लावून . उमेदवार निवडून आणले. उद्धव ठाकरे यांची ठाण्यावरची उरलेली पकडही त्यामुळे आता सैल झाली असल्याची चर्चा राजकीय वतुळात आहे. याचा फटका अर्थातच आगामी महापालिका निवडणुकीतही बसणार यात शंका नाही.

ठाणे महापालिकेची अखेरची निवडणूक २०१७ साली झाली होती. त्यानंतर २०२२ मध्ये कार्यकाळ संपल्यामुळे ती विसर्जित झाली. कोव्हिडमुळे आधी निवडणूक लांबणीवर पडली. तर नंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने गेल्या तीन वर्षांपासून पालिकेची निवडणूक खोळंबली आहे. आता सत्तास्थापनेनंतर पालिका निवडणुका होतील या आशेने लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झोकून दिलल्या सर्व माजी नगरसेवकांसमोर आशेचा किरण दिसू लागला आहे. यामध्ये १३१ पैकी ६७ माजी नगरसेवक शिवसेनेचे आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर यापैकी ६६ नगरसेवक शिदे गटाकडे असल्याचा दावा केला गेला. त्यानंतर तीन नगरसेवक ठाकरे गटाकडे वळले. तर काही नगरसेवक तटस्थ भूमिकेत असल्याचे पहायला मिळाले. किंबहूना विधानसभा निवडणुकीनंतर ते आपले पत्ते उघड करतील असे दिसत होते. पण अपेक्षेनुसार निकाल न लागल्याने आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आल्याने आता हे तटस्थ माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटातच राहतील असे दिसते.

आगामी महापालिका निवडणुकीत प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार देताना ठाकरे गटाला नवीन चेहरा द्यावा लागणार आहे. याची तयारी ठाकरे गटाने सुरू केल्याचे दिसते.

गेल्या आठवड्यात माजी खासदार राजन विचारे यांनी मेळावा घेऊन ‘मशाल‘ पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला कितपत यश मिळते हे आगामी काळ ठरवणार आहे .

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर जिल्ह्याची सुभेदारी एका व्यक्तीकडे देण्याऐवजी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच जिल्हाप्रमुख नेमले. पण केदार दिघे व्यतिरिक्त उर्वरित जिल्हाप्रमुुखांची हवी तशी छाप जिल्ह्याावर दिसली नाही. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना जिल्हाप्रमुख बनवून ठाकरे गटाने दिघे कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो अशस्वी ठरला. अडीच वर्षांपूर्वी सुरुवातीच्या काळात ठाकरे गटासोबत असलेल्या शिवसैनिकांमध्ये जो उत्साह होता किंवा झुंज देण्याची जी क्षमता होती ती आता हळूहळू मावळत चालली आहे. जुन्या सााथीदारांना घेऊन नव्याने पक्ष बांधणी, नवीन कार्यकर्ते जोडणे अशा सर्वच पातळ्यांवर ठाकरे गट मागे पडत जात असल्याचे दिसते.

आधी सत्तापालट आणि आता मोठया मताधिक्याने सत्तास्थापनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हुकमी एक्के ठरले आहेत. राज्याचा कारभार हाकताना त्यांनी ठाण्याची पकड सैल होऊ दिली नाही. लोकसभेत दोन खासदार आणि विधानसभेत सहा आमदार निवडून दिले. पालिकेवर प्रशासक असला तरी कारभार शिवसेना शिंदे गटाकडेच आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे या ठाण्याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसते. स्थानिक पातळीवर विश्वास ठेवून आहेत. त्यामुळे ठाण्यात ठाकरे गटाला सध्या कुणी वाली नसल्याचे चित्र दिसते. वाास्तविक लोकसभेत झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटाच्या प्रमुख स्थानिक नेत्यांनी पुन्हा एकदा जिल्हा पिंजून काढण्याची गरज होती. निवडणुकीत त्यांना बळ देण्यासाठी मातोश्रीवरून रसद आणि पहिल्या फळीतील नेत्यांनी ठाण्यात मुक्काम ठोकणे गरजेचे होते अशी चर्चा आता ठाकरे गटातच होत आहे.

मिळालेला कौल अन् धोक्याची घंटा
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी कळवा- मुंब्रा सोडला तर उर्वरित तीन ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी थेट लढत झाली. सर्व ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवाराला दुप्पटीहून कमी मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे ओवळा- माजिवाडा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार माजी उपमहापौर नरेश मणेरा यांना त्यांच्याच प्रभागामध्ये लीड मिळवता आला नाही. तर दुसरीकडे राजन विचारे यांना ठाणे मतदारसंघात राबोडी वगळता सर्वत्र अगदी त्यांचा गड असलेल्या चरई, चंदनवाडी या प्रभागातही बरोबरी साधता आली नसल्याने ही धोक्याची घंटा मानली जाते.