राज्यस्तरीय स्पर्धेत ठाणेकर बॅडमिंटनपटूंना नऊ पदके

तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि एक कांस्य पदकाचा समावेश

ठाणे: नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या योनेक्स सनराइज जेएसएस महाराष्ट्र राज्य १९ वर्षाखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये यंदाही ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.

20 ते 22 डिसेंबर 2024 या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या भव्य खुल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उभरत्या बॅडमिंटनपटूंनी उदंड प्रतिसाद दिला. एकूण पाच गटांमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू सामील झाले होता.

19 वर्षाखालील मुलांच्या एकेरीच्या गटात सुवर्ण रौप्य तसेच कांस्यपदक देखील पटकावण्याचा मान ठाणेकर खेळाडूंनी आपल्या नावे केला. अंतिम फेरीच्या सामन्यात आर्यन बिराजदार या खेळाडूला 21-14, 21-15 असे नमवून सर्वेश यादव याने सुवर्णपदक पटकावले, तर आर्यनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. याच गटात अर्जुन बिराजदार यांनी देखील कांस्यपदक पटकावले आहे. 19 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीच्या गटात मात्र आर्यन आणि अर्जुन बिराजदार ही जोडी अजिंक्यवीर ठरली.

अंतिम फेरीच्या सामन्यात सानिध्य एकाडे आणि सर्वेश यादव या बलाढ्य जोडीचा बिराजदार बंधूंनी 21-16,21-14 असा पराभव करून आपल्या सुवर्णपदकाची सुनिश्चिती केली तर ठाणेकर जोडी सानिध्य व सर्वेश यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याचप्रमाणे 19 वर्षाखालील मिश्र दुहेरीत सानिध्य आणि अदिती गावडे या नवनिर्वाचित जोडीने आपल्या उत्तम खेळाच्या सादरीकरणाने सर्वांचीच प्रशंसा प्राप्त केली आहे. त्यांनी उप उपांत्य फेरीच्या सामन्यात जीवा पिल्लाई व पिनाक रोकडे या जोडीचा 12-21,21-11,21- 16 असा पराभव करीत पुढील फेरीत आगेकूच केली.

उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रणय गाडेवार व क्रिषा सुनी या बलाढ्य जोडीचा सानिध्य व अदितीने दीर्घकाळ झालेल्या सामन्यात 15-21,12-21,21-19 असा पराभव करीत अंतिम फेरी धडक मारली परंतु अंतिम फेरीच्या अतितटीच्या सामन्यात सानिध्य व अदितीला पराभव स्वीकारावा लागला.

केवळ एकाच वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या या खुल्या राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण नऊ पदकांची ज्यात तीन सुवर्ण, पाच रौप्य व एक कांस्य पदक यांचा समावेश आहे, असे घवघवीत यश ठाणेकर खेळाडूंनी प्राप्त करून पुन्हा एकदा केवळ एकेरीच नव्हे तर दुहेरीतील देखील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

या घवघवीत यशासाठी या सर्व गुणी ठाणेकर बॅडमिंटन पटूंचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
ठाणेकर खेळाडूंच्या या घवघवीत यशासाठी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे योजनाप्रमुख श्रीकांत वाड त्याचप्रमाणे ज्येष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर व अक्षय देवलकर तसेच वरिष्ठ प्रशिक्षक श्रीकांत भागवत व राजीव गणपुले यांच्या समवेत विघ्नेश देवळेकर, कबिर कंझारकर, अमित गोडबोले, प्रसेनजीत शिरोडकर आणि एकेंद्र दर्जी यांना या खेळाडूंवर विशेष लक्ष देऊन प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.