वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन
मुंबई : आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि गेल्या चार दशकाहून अधिक काळ दूरदर्शनवर बातमीदारी करणाऱ्या प्रदीप भिडे यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर माध्यम क्षेत्र आणि इतर क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रदीप भिडेंच्या निधनाने ‘आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज बंद झाला आहे. विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रदिप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. प्रदिप भिडे यांनी ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं. त्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले.
प्रदीप भिडे यांनी ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरु केली. त्या माध्यमातून त्यांनी जाहिरात, माहितीपट आणि लघुपट यावर काम करत आपला ठसा उमटवला. प्रदिप भिडे यांनी आतापर्यंत सुमारे दीड ते दोन हजार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदन केले आहे.
राज्यात 1995 साली पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्यानंतर शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळ्याचे त्यांनी सूत्रसंचालन केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी आणि राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अनेक कार्यक्रमांचे त्यांनी सूत्रसंचालन केलं आहे.
त्यांनी कधीही तडजोडी केल्या नाहीत- वासंती वर्तक
वृत्त निवेदन, सूत्र-संचालन या अवाढव्य क्षेत्रात आपल्या नावाचे वलय-विश्व निर्माण झाल्यानंतरही प्रदीप भिडे यांनी कधीही, कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत. माणूस म्हणून ते अत्यंत चांगले होते. या क्षेत्रात उंचीवर गेल्यानंतरही त्यांचे पाय कायम जमिनीतच रोवलेले होते, अशी भावूक प्रतिक्रिया ज्येष्ठ वृत्त निवेदिका वासंती वर्तक यांनी ‘ठाणेवैभव’कडे व्य्यक्त केली.
‘सगळी माणसं त्यांना आवाजाच्या दुनियेचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखत असत. आकाशवाणी, दूरदर्शन आदी माध्यमांमध्ये सगळीकडे मीच घुसणार, इतरांशी स्पर्धा करणार अशी त्यांची वृत्ती कधीच नव्हती. त्यांनी जी कामे केली ती डौलदार केली आहेत. त्यांनी इतरांना संधी उपलब्ध करुन दिली होती. लोकांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे अनेकांना संधी मिळाली आहे. त्यांचे आई-वडिल शिक्षक असल्यामुळे त्यांनी ‘माणूस’म्हणून कायम मूल्य पाळले होते, असे वर्तक म्हणाल्या.