ठाणे : सलग दोन वेळा निवडून आल्यानंतर हॅटट्रिकच्या तयारीत असलेल्या महापौरांचा प्रभाग अनुसुचित जातीसाठी राखीव झाला आहे. योगायोगाने तिथे दोन महिलांचे आरक्षण पडल्यास त्यांना निवडून येण्यासाठी दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.
यंदा तीन सदस्य पॅनल पद्धतीने होणाऱ्या पालिका निवडणुकीत १४२ सदस्य निवडून येणार आहेत. त्यात ७२ जागा या महिलांसाठी राखीव आहेत. या नवीन रचनेमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या चार जणांच्या पॅनलपैकी एका नगरसेवकाचे ‘स्थलांतर’ होणार हे निश्चित आहे. त्यात ओबीसी आरक्षणाचे घोंगडे भिजत असले तरी महिला आरक्षण आणि अनुसूचित जाती, जमातीसाठीही जागा आरक्षित होणार असल्याने त्याचाही फटका विद्यमान नगरसेवकांना बसण्याची शक्यता आहे. यात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचा समावेश होऊ शकतो.
प्रभाग क्रमांक ०३, १०, १२, १५, २३, २४, २७, २९, ३४,आणि ४५ हे अनुसूचित जातीकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी पाच महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. यात महापौर नरेश म्हस्के यांच्याही प्रभागाचा समावेश आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार आनंदनगर, मेंटल हॉस्पिटल, रघुनाथ नगर, कशीश पार्क, गांधीनगर, सिद्धिविनायक नगर हा महापौर नरेश म्हस्के यांचा सध्याचा १९ क्रमांकाचा प्रभाग नवीन २७ क्रमांकाचा झाला आहे. या प्रभागाची लोकसंख्या ३५ हजार १५० एवढी असून या प्रभागात अनुसूचित जातीच्या नागरिकांची संख्या तीन हजार ५२८ एवढी आहे. त्याची टक्केवारी १०.४ इतकी आहे तर रँक आठ आहे, त्यामुळे हा प्रभाग अनुसुचित जातीसाठी जवळपास राखीव झाला आहे. महापौर खुल्या गटातून निवडणूक लढवण्यास पात्र आहेत. पण जागेच्या सोडतीत खुल्या गटातील दोन महिलांना लॉटरी लागली तर महापौरांची गोची होणार आहे.
आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी सध्या महापौर नरेश म्हस्के यांची धावपळ सुरू असल्याची चर्चा शिवसेनेत रंगू लागली आहे. त्यांच्या प्रभागाची लोकसंख्या चार हजाराने वाढली तर अनुसूचित जातीच्या नागरिकांची टक्केवारी कमी होऊन हे आरक्षण इतर प्रभागात जाईल. त्यासाठी त्यांचा तसा प्रयत्न सुरू असून शिवसेनेतील ज्येष्ठ नगरसेवकही हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी फिल्डींग लावत आहेत. असे चित्र असले तरी आपल्या सुरक्षित प्रभागातील लोकसंख्या महापौरांच्या झोळीत टाकण्यासहीr शिवसेनेचे पदाधिकारी तयार नसल्याचे समजते. त्यामुळे आता वरीष्ठ पातळीवरून या प्रभागातील आरक्षण इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठीच नवीन प्रभाग रचनेला महापौरांकडून विरोध होत असल्याची टीका विरोधक करत आहेत.
अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक ५, ६ आणि २९ हे आरक्षित झाले आहेत. उपमहापौर पल्लवी कदम यांचा चेंदणी खारटन रोड या २९ क्रमांकाच्या प्रभागात अनुसूचित जाती आणि जमाती अशा दोन्ही जागा राखीव झाल्या आहेत. येथे फक्त एकच जागा खुल्या वर्गासाठी राहणार असली तरी तेथून निवडणूक लढवण्याचा मार्ग उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासाठी खुला राहणार आहे. या प्रभागातून निवडणूक लढवण्यास उपमहापौरांचे पतीही इच्छुक आहेत. पण शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकाचे पुर्नवसन करायचे असल्याने त्यांची ही संधी हुकणार असल्याचे दिसते.