ठाणे : हिवाळा सुरू झाला असून गोड गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे. थंडीचा कडाका वाढला असून थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांमध्ये उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे. दरम्यान दरवर्षी स्वेटर विक्रीसाठी येणारे नेपाळी व्यापारी गायब असून यंदा पंजाब-हरियाणाचे स्वेटर स्टेशन परिसरात पाहायला मिळत आहेत.
ठाणे तसेच उपनगरांमधील बाजारामध्ये ऑक्टोबर महिन्यात लुधियाना, पंजाब व दिल्ली येथून स्वेटर विक्रीसाठी येतात. यंदाही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून ठाण्यातील मुख्य बाजारात स्वेटर विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होते. त्यामुळे या कालावधीत स्वेटरला मोठी मागणी असते. मात्र यंदा गोड गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून यंदा नागरिकांनी दिवाळीपासूनच उबदार कपड्यांची खरेदी करण्यास सुरु केली आहे. ठाण्याच्या मुख्य बाजारात स्वेटर, जाकीट, कोट, सॉक्स, मफलर इत्यादी कपड्यांची उपलब्धी असून यंदा झिप्परची जास्त मागणी आहे.
पुरुषांसाठी स्वेटर्स, फॅन्सी स्वेटर्स, स्वेट शर्ट, कानटोपी, मफलर, हातमोजे, जॅकेट, फॅन्सी जॅकेट, हेड कॅप उपलब्ध आहेत. तर महिलांसाठी शाल, स्वेटर्स व जॅकेटही असून चिमुकल्यांसाठीही आकर्षक उबदार कपडे उपलब्ध आहेत. यंदा किंमती काही प्रमाणात वाढल्या असल्या तरी नवीन व्हरायटी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.अगदी २०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत स्वेटर उपलब्ध आहेत.
ठाण्याच्या संस्कृतीचा भाग असलेला ठाणे स्थानक परिसरातल्या स्वेटर मार्केट मध्ये मात्र यावर्षी नॉर्थ ईस्टमधल्या व्यापाऱ्यांची कमतरता भासत आहे. मागील अनेक दशक नॉर्थ ईस्टवरून येणारे व्यापारी ठाण्यात आपला व्यवसाय करत होते. कोरोनाचा दोन वर्षांचा काळ ठप्प झालेला व्यवसाय, कच्च्या मालाचा वाढलेल्या किमती आणि ग्राहकांची कमतरता अशा एकूणच सर्व अडचणीच्या बाबी लक्षात घेऊन आता स्वेटर विक्रीसाठी नेपाळ व नॉर्थ ईस्ट वरून येणारे व्यापारी ठाण्यात दिसत नाहीत. त्यामुळे लुधियाना, पंजाब व दिल्ली या ठिकाणी तयार झालेले स्वेटर बाजारात पाहायला मिळत आहेत आणि याच स्वेटरांच्या विक्रीतून अनेक व्यापारी आपला उदरनिर्वाह करत आहेत.