मोदींना भेट मिळालेल्या वस्तूंसंदर्भात सरकारचा महत्वाचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून पुढील तीन आठवड्यांपर्यंत केंद्रीय संस्कृती मंत्रालय मोदींना मिळालेल्या १३०० भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचाही ई-लिलाव सुरु केला आहे. या लिलावामध्ये नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकताना फेकलेला भाला, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने पदक जिंकताना वापरलेलं रॅकेट याचाही समावेश आहे. मात्र हा लिलाव सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यांमध्येच या वस्तूंसाठीच्या लिलावाच्या रक्कमेमध्ये मोठी घट झाल्याचं पहायला मिळत आहे. ८० लाख ते १ कोटींदरम्यान या वस्तूंची बेस प्राइज असणार आहे. मात्र या लिलावात काही खोटी प्रकरणं समोर आली असून एकाने तर निरजच्या भाल्यासाठी १० कोटींची खोटी बोली लावली होती. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मंत्रालयाने ही बोली रद्द ठरवली आहे.
हा लिलाव सुरु झाल्यानंतर काही वस्तूंना अगदी १० कोटींपर्यंतची बोली लागल्याचं दिसून आलं. मात्र नंतर ही बोली खोटी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मंत्रालयाने या बोली रद्द ठरवल्याची माहिती संस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं द हिंदूने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. बुधवारी निरज चोप्राने वापरलेल्या भाल्यासाठी ५ कोटींची बोली लागली. पहिल्या आठवड्यात याच भाल्यासाठी १० कोटींची बोली लावण्यात आलेली. सिंधूने वापरलेल्या रॅकेटसाठी बुधवारी एक कोटी १० लाखांची बोली लागली. १८ सप्टेंबर रोजी याच रॅकेटसाठी ९ कोटींची बोली लावण्यात आलेली. बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनच्या ग्लोव्हजसाठी किमान मर्यादा ८० लाखांची ठेवण्यात आली आहे. याच ग्लोजसाठी १८ तारखेला १० कोटींची बोली लावण्यात आलेली. मात्र यापैकी अनेक बोली या खोट्या असल्याचं समोर आल्यानंतर त्या रद्द करण्यात आल्यात.
महिन्याभरापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी, या खेळाडूंनी मोदींना भेटवस्तू म्हणून स्पोर्ट्स गियर आणि उपकरणं दिली होती. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पंतप्रधान मोदींना आपलं बॅडमिंटन रॅकेट तर सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने भाला भेट दिला होता. याचसोबत, पंतप्रधान मोदींनी मिळालेली राम मंदिराची प्रतिकृती, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर मॉडेल, काही शिल्पं, सादर केलेली चित्रं आणि अंगवस्त्र देखील या लिलावात ठेवण्यात आल्या आहेत. २०१९ साली अशाच लिलावामधून १५ कोटी १३ लाख रुपयांचा निधी जमल्याची माहिती संस्कृतिक मंत्रालयाने दिलीय.
कुठे वापरला जाणार हा पैसा?
१७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान pmmementos.gov.in वर हा ई-लिलाव केला जाईल. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने म्हटलं आहे की, या लिलावातून जो काही निधी मिळेल तो गंगा नदीच्या संवर्धनासाठी चालवल्या जाणाऱ्या ‘नमामी गंगे’ मिशनसाठी वापरला जाईल.