नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवल्यानंतरच्या पहिल्याच स्पर्धेत शानदार पुनरागमन केले. तुर्कू (फिनलंड) येथे सुरू असलेल्या पाव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेत अनेक नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीत ८९.३० मीटर अंतर भाला फेकत स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत रौप्यपदक मिळवले.
२४ वर्षीय चोप्राने १०हून अधिक महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि जवळपास ९० मीटर अंतर तो गाठू शकला. जागतिक भालाफेकमध्ये ९० मीटर अंतरापर्यंत पोहोचणाऱ्या खेळाडूचा दर्जा सर्वोत्तम समजला जातो. चोप्राने गेल्या वर्षी मार्चमध्ये पतियाळा येथे ८८.०७ मीटर भाला फेकत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. त्याने गेल्याच वर्षी ७ ऑगस्टला ८७.५८ मीटर अंतर भाला फेकत टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच प्रयत्नात नीरजने ८६.९२ मीटर अंतर गाठले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.३० मीटर अंतर भाला फेकला. त्याचे पुढील तीन प्रयत्न वाया गेले. सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्याने ८५.८५ मीटर अंतर कापले. फिनलंडच्या २५ वर्षीय ऑलिव्हर हेलँडरची सर्वोत्तम कामगिरी ८८.०२ मीटर तर, हंगामातील सर्वोच्च कामगिरी ही ८०.३६ मीटर अशी होती. त्याने सर्वानाचा आश्चर्याचा धक्का देत आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात ८९.८३ मीटर अंतर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले.
८९.३० मीटर अंतर गाठल्यामुळे नीरज जगातील आघाडीच्या भालाफेकपटूंच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. स्पर्धेत ग्रनेडाचा जगज्जेता अँडरसन पीटर्स हा सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात होता, मात्र ८६.६० मीटर अंतरासह त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक स्तरावर सर्वाधिक वेळा ९० मीटर अंतर पार करण्याचा विक्रम नावे असलेला आणि नीरजचा कडवा प्रतिस्पर्धी जर्मनीच्या जोहानीस वेटरने या स्पर्धेतून माघार घेतली होती. नीरज आता फिनलंडमधील कोर्टेन क्रीडा स्पर्धेत शनिवारी सहभाग नोंदवणार आहे, तसेच ३० जूनला डायमंड लीगच्या स्टॉकहोम येथे होणाऱ्या टप्प्यात तो भाग घेईल. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी नीरज अमेरिका आणि तुर्कीत सराव करत होता.
या कामगिरीने मला आनंद झाला आहे. या हंगामातील माझी पहिलीच स्पर्धा आहे. त्यामुळे मी हंगामाला चांगली सुरुवात केल्याचे समाधान आहे. या कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास दुणावेल. मी आता तंत्र, फेक आणि एकूण कामगिरीवर लक्ष देणार आहे. येणाऱ्या स्पर्धामध्ये हीच लय कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.
– नीरज चोप्रा