आयुर्वेद प्रसारासाठी अधिक प्रयत्नांची गरज

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचे मत

ठाणे : विश्वामध्ये अनेक चिकित्सा आहेत, परंतु आयुर्वेद ही पद्धती विशेष आहे. आयुर्वेदासाठी आणखीन प्रयत्न केल्यास जगात आयुर्वेद आपण आणखी पुढे नेऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

‘आयुर्वेद सर्वांसाठी-जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन’ या विषयावर आयुष मंत्रालय, भारत सरकारतर्फे ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळा आणि एआयएसी कॉन, 2024 आयोजित करण्यात आले आहे. याचा शुभारंभ श्री.नाईक यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते.

‘मी आयुष मंत्री असताना जो सन्मान तुम्ही मला दिला त्याच्यापेक्षाही जास्त सन्मान आजच्या कार्यक्रमामुळे मला दिला आहे’, असे प्रारंभी नमूद करून श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, जगामध्ये अनेक चिकित्सा पद्धती आहेत, परंतु आधुनिक जीवन आणि वेद अर्थात ज्ञान व जीवन कशाप्रकारे जगायचे हे सांगणे म्हणजे आयुर्वेद होय. आधुनिक जीवन जगताना आपल्या मूळ सिद्धांतावरच यावेच लागेल. कोरोनासारखे अनेक शत्रू यापुढेही हल्ला करण्यास सज्ज आहेत, अशावेळी आयुर्वेद सक्षम करणे गरजेचे आहे’, असे ते शेवटी म्हणाले.

भारतात सर्वात जास्त आयुर्वेदिक महाविद्यालये महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे इथे एक स्वतंत्र आयुर्वेदिक विद्यापीठ व्हावे तसेच प्रत्येक बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात आयुर्वेदाचा समावेश होणे गरजेचे आहे, असे मत महासंमेलानाचे अध्यक्ष पद्मश्री, पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा (अध्यक्ष, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट) यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर मुंबईत मरिन ड्राइव्ह परिसरात एक जुने मित्तल आयुर्वेदिक महाविद्यालय आहे ते बंद होण्याच्या मार्गावर आहे. यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे आणि ती जागा आयुर्वेदाच्या कामासाठी उपयोगात आणावी अशी विनंती त्यांनी यावेळेस केली.

बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर आयुषच्या माध्यमातून काही सुयोग्य हस्तक्षेप करून होणारे दीर्घकालीन नुकसान रोखण्याचा प्रयत्न आहे असे आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा या संमेलनात म्हणाले. आयुर्वेदिक शास्त्रातील उपायांचा आधुनिक वैद्यक उपचार पद्धतीत उपयोग करून रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवताना रोगाच्या मुळाशी जाण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असेही ते पुढे म्हणाले. पथ्य-अपथ्य, दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म आणि अन्य उपचारपद्धतींचा संतुलित वापर केल्याने समाज स्वास्थ्य सुदृढ राहू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव आरती अहुजा यांनी आपल्या भाषणात यापुढे कामगार रुग्णालयांमध्ये आयुर्वेद उपचारासाठी 50 रुग्णशय्या ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. सार्वजनिक आरोग्य म्हणजे केवळ उपचार नसून प्रतिबंध करणे महत्वाचे असते. आजारावर प्रतिबंध आणण्याची क्षमता ही केवळ आयुर्वेदमध्ये आहे असे देखील त्या यावेळेस म्हणाल्या.

यावेळी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाची मोबाईल ॲप पत्रिका आणि 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आयुर्वेदासाठी विशेष कार्य करणाऱ्यांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या महासंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून महासंमेलानाचे अध्यक्ष पद्मश्री, पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा (अध्यक्ष, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन ट्रस्ट), आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, वैद्य जयंत देवपुजारी (चेअरमन, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम्स ऑफ मेडिसीन), डॉ. मनोज नेसारी (ॲडव्हायजर (आयुर्वेद) मिनिस्ट्री ऑफ आयुष, भारत सरकार) आणि वैद्य राकेश शर्मा (प्रेसिडेंट, बोर्ड ऑफ इथिक्स अँड रजिस्ट्रेशन, एनसीआयएसएम), वैद्य मनोज, वैद्य रामदास आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. रमण गुंडाळकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.

या महासंमेलनात तणाव निमंत्रण, वेदना व्यवस्थापन, योग आणि आयुर्वेद, संधिविकार व्यवस्थापन, योग आणि सत्वावजय चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद, आयुर्वेदातून रोगप्रतिकारशक्ती, आयुर्वेदातील त्वचा व केसांची काळजी, स्त्री विकारांचे व्यवस्थापन, पचन विकारांचे व्यवस्थापन आयुर्वेदिक दिनचर्या व स्वास्थ्यपूर्ण आहार, सामान्य जीवनशैलीजन्य विकारांचे व्यवस्थापन या विषयांवर आयुर्वेदिक तज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने होणार आहेत.

नागरिकांसाठी, कायचिकित्सा/जनरल मेडिसीन, त्वचाविकार, योग व डाएट, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा आदी आजारांवर मोफत रुग्ण तपासणी, आयुर्वेदिक सल्ला-ओपीडी उपलब्ध असून, आयुर्वेदिक तज्ञांमार्फत ही तपासणी विनामूल्य केली जाणार आहे.

ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन व श्री समर्थ सेवक मंडळ, डॉ. मूस मार्ग, ठाणे पश्चिम येथे 19 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान हे आयुर्वेदिक महासंमेलन सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपन्न होत आहे. मैदानात 55 नामांकित आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल्स आहेत, जे नागरिकांना सवलतीच्या दरात आयुर्वेदिक औषध उपलब्ध करून देतील. या सुवर्णसंधीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.