कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ आता गोरेगाव फिल्मसीटीच्या ताब्यात

मुंबई: दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडीओ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडीओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडीओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

या पाहणी दौऱ्याकरीता महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उप सचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता (स्थापत्य ) विजय बापट, विशेष कार्यकारी अधिकारी संजय पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.

राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सादर केलेल्या रिझोल्यूशन प्लानला १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मान्यता दिल्याने यापुढे एन.डी.स्टुडीओचे दैनदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार आहेत.

त्यामुळे हे सर्व कामकाज जाणून घेण्यासाठी श्री.खारगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एन.डी. स्टुडीओची प्रत्येक्ष पाहणी केली. तसेच येथील कार्यरत असलेल्या व्यवस्थापनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नियमित कार्यप्रणाली समजून घेतली.