नवरात्री, नवे रुप!

गणेशोत्सवाच्या पाठोपाठ येणाऱ्या नवरात्रौत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. देवीची आराधना करताना तिच्यातील अंगभूत वैशिष्ट्यांचा आविष्कार आपल्याही व्यक्तीमत्वात उमटावा ही भक्तांची इच्छा असते. त्यामुळे हा उत्सव महिलासाठीच असतो असे कदापि मानले गेलेले नाही . कारण शक्ती बुद्धी आणि ऐश्वर्याची अभिलाशा सर्वानाच असते. ती देवीच्या उपासनेतूनच साध्य होत असते.या नवरात्रौत्सवाकडे पहाण्याचा दृष्टीकोन त्यामुळे व्यक्तीसापेक्ष असला तरी अंतिमत: त्याचा हेतू आत्मिक आनंद, उत्कर्ष, दिर्घायू आणि समाधान यांच्या प्राप्तीत असतो. अशा या नवरात्रौत्सवास शुभारंभ होत असताना आपण नऊ दिवस कोणते संकल्प सोडणार आहोत याची खूणगाठ प्रत्येकाने बांधायला हवी.
आमच्या मते सांप्रत काळ हा दररोज एक नवीन आव्हान घेऊनच उगवत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे ढग अजूनही कमी होण्याचे नाव घेत नसताना इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे अक्राळविक्राळ हमास रुप पाहून सर्वांच्या मनात धडकी भरली आहे. भारताचे आकारमान इस्त्रायलच्या तुलनेत मोठे असले तरी सीमेवरील शेजारी राष्ट्रांकडून काढल्या जात असलेल्या कुरापतींमुळे आपल्याला जागता पहारा ठेवावा लागत आहे.आर्थिक प्रगतीत अनिश्‍चितता आणि अस्थिरतेचे ग्रहण लागलेले असते. अशा वेळी देवीतील शक्तीरुपाची आराधना करुन या संकटावर मात करण्याची धारणा प्रस्तुत ठरते.अर्थात देशाच्या अनेकाविध गरजा लक्षात घेता देवीच्या महिषासूरमर्दिनी रूपाची आवश्यकता अधिक स्वाभाविक मान्यता मिळवते.
महिलांना आरक्षणाचा फायदा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय अलिकडेच पंतप्रधानांनी घेतला. वास्तविक भाजपाचे एकूण ‘टाईमिंग’ साधण्याचे कौशल्य पहाता नवरात्रीचा मुहुर्त त्यासाठी अधिक उचित ठरला असता. परंतु धर्म आणि राजकारण यांची सांगड घालून एका सामाजिक आणि जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाला त्यांनी कोणताही रंग न देणे उचित मानले असेल तर तो मुत्सद्दी राजकरणाचा भाग समजला जावा! आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने व्हावी असे साकडे निदान राजकीय परिक्षेत्रात वावरणाऱ्या भगिनी देवीला नक्की घालतील. परंतु आरक्षणामुळे महिलांचे प्रश्‍न खरोखरीच कायमचे सुटणार आहेत काय, याचे आत्मपरीक्षण नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची नऊ रुपे समोर आणून समस्त महिलावर्गाने करावे असे वाटते. आरक्षणापेक्षा महिलांनी आत्मविकास आणि स्वयं उत्कर्ष साधण्यासाठी स्वावलंबनाचा मार्ग शोधायला हवा.आरक्षणाच्या कुबड्यांशिवाय तो यत्न झाला तर महिलांना आपली खरी ओळख साधता येईल. अधूनमधून ती होत असते. अशा ‘देवी’ आपल्याला चांद्रयान मोहिमेत दिसल्या होत्या की!
ज्या नऊ गुणवैशिष्ट्यांच्या अनुकरणामुळे महिलांच्या जीवनात अमुलाग्र आणि चिरकाळ बदल घडू शकेल ते पुढीलप्रमाणे आहेत. 1) आत्मनिर्भरता 2) आत्मविश्‍वास 3) आत्मचिंतन 4) आत्मविकास 5) सशक्त मानसिकता 6) सकारात्मकता 7) सहवेदनशीलता 8) निर्धार आणि 9) आत्मसन्मान.
मुलींच्या शिक्षणाकडे सरकारचा बघण्याचा दृष्टीकोन आणि मुलींना शिकवले तरच त्या आत्मनिर्भर होऊ शकतात ही समाजाची वाढती धारणा याची प्रचिती सरकारी धोरणात दिसणे हा चांगला योगायोग आहे. मुलींना दुय्यम स्थानावरुन मुलांबरोबर आणणे ही पुरोगामी विचारधारा आत्मनिर्भरतेची वाट मोकळी करीत आहे. ती जितकी स्वावलंबी असेल तितकी ती स्वत:च्या उत्कर्षाकडे लक्ष देणार आहे. समाजाचा निकोप दृष्टीकोन आणि अनुकूल पर्यावरण यामुळे आत्मनिर्भरता आता दिसू लागली आहे.
आत्मविश्वास असेल तर मुलींना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळते. हा आत्मविश्वास शिक्षणातून येतो यात दुमत नाही. महिलांच्या दबलेल्या आवाजाला व्यक्त होण्याची संधी शिक्षण देत असते. ज्यापद्धतीने महिला आणि मुली सार्वजनिक जीवनात वावरत आहेत ते पहाता त्यांच्यात आत्मविश्वासाचे स्फुल्लिंग चेतवण्यात समाज यशस्वी झाला आहे. महिलांनी देवीचे कोणतेही रुप डोळ्यासमोर आणले तर त्यांना मूर्तीमंत आत्मविश्वासाचे विराट दर्शन होईल.
कोणीतरी सांगिते आणि म्हणून तसेच वागले वा बोलले पाहिजे या पुरुषप्रधान समाजातील अंहकारी अट्टाहास गाडण्याचे काम महिलांना करावे लागेल. स्त्रीमुक्तीचे ती साक्ष असली तरी त्यातच तिच्या अभिव्यक्तीची बीजे आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. हा विषय सुरुवातीच्या सावंगपणाला भेदून परिपक्वतेच्या परीक्षेपात गेला आहे. निर्णयप्रक्रियेत एक महत्वाची भूमिका त्या घेत आहेत. ही जागा त्यांनी केलेल्या सातत्याच्या आत्मचिंतनामुळे प्राप्त झाली आहे. औपचारिक शिक्षणाची सोय करण्याचे कर्तव्य सरकारने पार पाडले, परंतु दैनंदिन जीवनात त्याचा प्रभावी वापर आत्मचिंतनातूनच होत असतो. या गुणाचे संवर्धन करण्याची ताकद देवीने द्यावी ही प्रार्थना या नवरात्रीत अनिवार्य ठरते.
भाौतिक विकासाचा प्रश्‍न शिक्षण, कौशल्यविकास आणि जबाबदारी निभावण्याच्या क्षमता वाढल्यामुळे सुटत असतो. परंतु आत्मिक आनंदासाठी आत्मिक विकास लागतो अनिवार्य आहे. ती दृष्टी आणि आसक्ती शिक्षणाबरोबरच मनाशी केलेल्या करारामुळे शक्य होते. देवीचे रुप जितके सोज्वळ असते तितकेच ते आक्रमक असते. ती उत्पत्तीचे प्रतिक आहे तशीच कठोर निश्चयाचे रूप आहे.तिच्या डोळ्यात दिसणारा निर्धार आपल्यात आणण्यासाठी कडक उपासना लागते. ती केली तर आत्मविकासाचे विविध आयाम महिलांच्या जीवनात एक वेगळीच कीमया घडवू शकते.
महिला सबलीकरण, सक्षमीकरण वगैरेचे वारे जोरात वाहत असले तरी महिलांवर अनेक आघात करुन त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न अविरत सुरु असतात. सशक्त शरीरात सशक्त मन असावे लागते. आरक्षण हे एक माध्यम ठरु शकेल. परंतु त्यावर पूर्णता अवलंबून राहणे म्हणजे मानसिक दुर्बलतेला स्वीकारण्याचे होईल. महिलांना काही गुण उपजत मिळाले आहेत. त्या निश्चियाच्या महामेरु असतात. एकदा त्यांनी ठरवले तर निर्धार त्यांचा गुलाम होऊन हात जोडून उभा रहातो. अर्थात हे जन्मजात गुण त्या प्रचंड कष्टाने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी वाढवत असतात. पुरुष उद्ध्वस्त झाल्यावर त्याला सावरण्याचे काम स्त्रीने केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. आणि हे कर्तृत्व घरापुरते मर्यादित नसून आजारी उद्योगधद्यांना उर्जित अवस्थेत आणण्याचे काम त्यांनी केले आहे. महालक्ष्मी आणि कडकलक्ष्मी अशी तिची दोन रुपे तिच्यातील सुप्त दैवी गुणांमुळे साध्य झाली आहेत.
आरक्षणाच्या पायरीपासून सुरु झालेले हे विचार-मंथन आत्मसन्मानाच्या कळसापर्यंत पोहोचत असताना देवीचे विविध रुपांचे पूजन का होणे आवश्यक आहे हे स्पष्ट होते. अन्नपूर्णा, महालक्ष्मी, सरस्वती, महाकाली, दुर्गा, शतचंडी, महिषासूरमर्दिनी अशी अनेक रुपे आणि त्यांचे आविष्कार प्रत्येक स्त्री अथवा पुरुषात आले तर तो खर्‍या अर्थाने पूर्णत्वास पोहोचू शकेल. आरक्षणामुळे महिलांच्या सन्मानाची औपचारिकता साध्य होईल. पण आत्मसन्मान हा तिला अन्य गुणांना पदरी पाडूनच मिळवावा लागेल. समस्त भक्तीमंडळींना या नवरात्रीत स्वत:चे नवे रुपे सापडावे हीच प्रार्थना!