व्हीआयपी क्रमांकासाठी नवी मुंबईकरांनी मोजले साडेसहा कोटी

वर्षभरात ६२९१ जणांनी वाहनांसाठी घेतला आवडता क्रमांक

नवी मुंबई : एखादे वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाच्या क्रमांकावरून समाजात आपली वेगळी ओळख दर्शवण्याचा कल सध्या अधिक वाढला आहे. त्यासाठी हवे तेवढे पैसे मोजण्याची तयारी या वाहन मालकांची असते. अशाच व्हीआयपी वाहन क्रमांकापासून नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत सहा कोटी ४० लाख ३१,५०० रुपयांची भर पडली आहे.

प्रत्येक नागरिक आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यानंतर एकतरी वाहन खरेदी करतो. त्यापैकी काही जणांना आवडता क्रमांक हवा असतो. त्यामध्ये काही जणांना जन्मतारीख, जुन्या गाडीचा क्रमांक, एखादा लकी क्रमांक घेण्यास प्राधान्य दिले जाते, तर काही जण ‘व्हीआयपी’ क्रमांक असावा म्हणून आवडता क्रमांक घेण्यास प्राधान्य देतात. ‘आरटीओ’कडून देखील वाहनाच्या क्रमांकाची नवीन शृंखला सुरू झाल्यानंतर खास पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. त्यानुसार नागरिक पसंती क्रमांकासाठी अर्ज करतात. पण बऱ्याच वेळेस एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज येतात. त्यावेळी लिलावाच्या माध्यमातून त्या क्रमांकाची विक्री केली जाते. जो वाहनचालक जास्त पैसे देईल त्याला तो क्रमांक लिलावाच्या माध्यमातून दिला जातो.

नवी मुंबई उप प्रादेशिक कार्यलयात देखील अशा व्हीआयपी, पसंतीच्या क्रमांकासाठी अनेक वाहन चालक आगाऊ बुकिंग करतात. त्यात दुचाकी, चारचाकी तर काही व्यवसायिक वाहनांना देखील असे क्रमांक घेतात. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात नवी मुंबई प्रादेशिक कार्यालयात पसंतीच्या आणि व्हीआयपी अशा एकूण ६२९१ वाहनांची नोंद झाली असून त्यापोटी एकूण सहा कोटी ४० लाख ३१,५०० रुपयांची भर परिवहनच्या तिजोरीत पडली आहे, अशी माहिती उप प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.