Thanevaibhav Online
14 September 2023
नवी मुंबई: नवी मुंबईत समाधानकारक पाऊस पडला असला तरी मागील आठ वर्षातील निचांकी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत शहरात २२८७.६१ मिमी.पावसाची नोंद झाली असून २०१६ मध्ये सर्वात कमी १६१४.०४ मिमी तर २०१९मध्ये ४४१९.११ मिमी विक्रमी पाऊस पडला होता.
यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) मध्ये राज्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहेत. ‘आयएमडी’तर्फे सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून तशीच परिस्थिती आहे. मात्र कोकण किनारपट्टी यास अपवाद ठरली असून या भागात चांगला पाऊस झाला आहे. हीच परिस्थिती नवी मुंबई शहरात देखील आहे.
नवी मुंबई शहरात यंदा सरासरी पाऊस पडला असला तरी तो तुलनेने कमी आहे. मात्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मुबलक पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात यंदा ३२९८.८० मिमी पावसाची नोंद झाली असून धरण काठोकाठ भरले आहे. धरणात ९७.५४टक्के जलसाठा असून पाण्याने ८७.५१ मीटर पातळी गाठली आहे. धरण ८८ मिटरला भरते. त्यामुळे नवी मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
नवी मुंबई शहरात आज शेती नसल्याने झळ बसत नाही. मात्र पावसाची घटलेली सरासरी विचार करायला लावणारी आहे. यंदा १३ सप्टेंबरपर्यंत २२८७.६१ मिमी पावसाची नोंद झाली असून मागील १४ वर्षातील दुसऱ्यांदा कमी नोंद झाली आहे.
मागील १४ वर्षातील पावसाची नोंद
२०१०: २३६४.८० मिमी
२०११: २६०८.५० मिमी
२०१२: २३२६.३९ मिमी
२०१३: ३३४७.३९ मिमी
२०१४: २५३९.६६ मिमी
२०१५: १६१४.०४ मिमी
२०१६: २७०६.४२ मिमी
२०१७: ३१२३.७८ मिमी
२०१८: २६३६.७८ मिमी
२०१९: ४४१९.११ मिमी
२०२०: २७२७.५० मिमी
२०२१: ३१९२.०२ मिमी
२०२२: २९१४.९७ मिमी
२०२३: २२८७.६१ मिमी
.