* नदी किनाऱ्याच्या विकासासह विविध कामांचे होणार भूमिपूजन
* आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
कल्याण : केंद्र शासन, राज्य शासन व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत २.५ कि.मी. लांबीचा नदी किनारा सुशोभिकरण आणि शिवकालीन नौदल प्रतिकृतीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याच बरोबर विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उदघाटन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार आहे.
दुर्गाडी किल्ल्या लगतच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची नौका बांधणीची मुहूर्तमेढ रोवली होती. या किना-याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नदीकिनारा व नेव्हल गॅलरी विकसित करण्याचा प्रकल्प स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत हाती घेण्यात आला आहे. यामध्ये शिवकालीन आरमार प्रतिकृती संग्रहालय, भारतीय नौसेनेच्या बलाढ्य जहाजाची प्रतिकृती, आय.एन.एस अरिहंत प्रमाणे उभारली जाणार आहे. समुद्र किनाऱ्याचे रक्षण करणाऱ्या बलाढ्य भारतीय नौसेनेचा अति विशाल माहितीपट तसेच 2.5 कि.मी किनारा सुशोभीकरण, दुर्गाडी किल्ल्या लगत बगीचा विकसित करणे, पायवाट व सायकल ट्रॅक बनविणे, लहान मुलांसाठी प्ले एरिया, व्याख्यान एरिया तयार करणे इत्यादी सुविधांमुळे कल्याण शहराचा नदीकिनारा विकसित होऊन नागरिकांना मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉक करिता पर्याय उपलब्ध होणार आहे दुर्गाडी किल्ला परिसरालगत विकसित होणा-या बगीच्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर घालण्यास मदत होईल तसेच पुढील पिढ्यांना नाविक क्षेत्रातील भविष्यातील संधी, यांची माहिती देणारे हे शिवकालीन आरमाराचे प्रतिकृती संग्रहालय कल्याणच्या सार्वजनिक व सांस्कृतिक वास्तूंच्या यादीत नक्कीच भर टाकेल.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाच्या नुतनीकरणात सभागृहामध्ये एकूण १४५ महापालिका सदस्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षक गॅलरी, पत्रकार गॅलरी व महत्वाच्या व्यक्तीसाठी व्ही.आय.पी. कक्ष अशी सुसज्ज आसन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. सभागृहामध्ये उर्जा कार्यक्षम एलईडी दिवे व अत्याधुनिक पध्दतीची विदयुत संच मांडणी करण्यात आली असून ३१ टन क्षमतेचे मित्सुबीशी कंपनीची उर्जा बचत करणारी VRV प्रकारची अद्ययावत मध्यवर्ती वातानुकुलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टेलीव्हिक कंपनीची अद्ययावत ऑडीओ यंत्रणा, १४० डेलिगेट युनिट, एक चेअरमन युनिट, १२ स्पिकर अदययावत यंत्रणा डेलिगेट युनिटवरील घुसनेक माईकची उंची ७० से.मी. ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे मा. सदस्यांना योग्यरित्या चर्चा करता येईल. तसेच सभागृहात हायड्रंट यंत्रणा, फायर स्प्रिंकलर यंत्रणा, फायर अर्लाम यंत्रणा, स्मोक डिटेक्टर इ. तसेच अद्ययावत अग्निशमन यंत्रणेची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
कल्याण पूर्व परिसरात प्रभाग क्र. १०० तिसगाव गावठाणमध्ये ३२०० चौ. फूट क्षेत्रामध्ये महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून डायलिसिस सेंटर तयार करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध होणार आहे. या योजनेत समाविष्ट न होऊ शकणाऱ्या रुग्णांना ८४९ तसेच एचआयव्ही रुग्णांसाठी रु. ८५१ या अल्प दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या केंद्रामध्ये १० डायलिसीस मशिन उपलब्ध होणार असून प्रतिदिन ३० रुग्णांना डायलिसीस सुविधा पुरवणे शक्य होणार आहे. कल्याण पूर्व “ड” प्रभाग , “जे” प्रभाग तसेच कल्याण ग्रामीण परिसरात डायलिसिस केंद्र नसल्यामुळे डायलिसिसची आवश्यकता असणाऱ्या गरजू लोकांना कल्याण पश्चिम किंवा डोंबिवली, ठाणे येथे जावे लागते. सदर डायलिसिस सेंटर तयार केल्यामुळे सदर परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे आणि यामुळे सदर आजारी व्यक्तींचा दूरवरचा प्रवास, खर्च, वेळ, त्रास, होणारी दगदग वाचणार आहे.
यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री खासदार कपिल पाटील, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, पालिका आयुक्त आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.