ठाणे : भाजपा व्यापारी सेलचे अध्यक्ष मितेश शहा व व्यापारी मंडळाच्या पुढाकाराने यंदा शाॅपिंग फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने गोखले रोड रोषणाईने उजळून निघाला आहे. या फेस्टिवलचा शुभारंभ आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
दिवाळीनिमित्त शहरातील अनेक रस्त्यांवर विद्युत रोषणाई केली जाते, कंदील लावून रस्ते सजवले जातात. गोखले रोडवर ही सजावट करण्यात आली आहे. या रोषणाईमुळे हा परिसर सायंकाळी आणि रात्री उजळून निघत आहे, त्यामुळे बाजारपेठेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नौपाडा-गोखले रोड बाजारपेठ अनेक वर्षांपासून खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी होत असून विविध प्रकारच्या वस्तू ग्राहकांना येथे उपलब्ध होत आहेत. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहने, कपडे आणि सोने खरेदीला नागरिकांची अधिक पसंती असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून दरवर्षी सवलती देण्यात येत असतात. यंदाही ग्राहकांसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. सोन्याच्या पेढीत सोने-चांदीच्या घडणावळीत विशेष सूट, वाहन खरेदीवर सवलत घोषित करण्यात आल्याने हा परिसर ठाणे आणि उपनगरातील नागरिकांचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे.
यावेळी विविध ठिकाणी रांगोळी काढली जाईल तर लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी या शाॅपिंग फेस्टीवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन मितेश शहा यांच्या वतीने करण्यात आले आहे.