महिलांवरील अत्याचारविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक

ठाण्यात जोरदार निदर्शने

ठाणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होऊ लागली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून ठाण्यात जोरदार निदर्शने करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

डायघर येथे एका मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर तीन पुजार्‍यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली. तर उरण येथे एका यशश्री शिंदे या तरूणीची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप करीत डाॅ.जितेंद्र आव्हाड तथा प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे-पालघर विभागिय महिलाध्यक्षा ॠता आव्हाड, ठाणे शहराध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, महिला संरक्षणाचे धोरण राबविता येत नसल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

या आंदोलनात माजी नगरसेविका अपर्णा साळवी, आरती गायकवाड, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, प्रदेश प्रतिनिधी शशी पुजारी, मनिषा करलाद, माधुरी सोनार, प्रियांका सोनार, जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, हिरा पाटील आदी सहभागी झाले होते.