नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेऊन तिच्या पायाभूत सुविधांसह कामकाजातही आवश्यक सुधारणा करून राष्ट्रीय दर्जाचा बाजार विकसित करण्याच्या दृष्टीने वेगाने काम करण्याचे निर्देश पणन मंत्री तथा बाजार समितीचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी बुधवारी दिले. बाजार समितीचे संपूर्ण कामकाज पुढील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर डिजिटल आणि शक्य तितके रोखरहित करण्याचे उद्दिष्टही त्यांनी निश्चित केले.
रावल यांनी बाजार समितीच्या विविध आवारांची प्रत्यक्ष पाहणी करून व्यापारी, कामगार आणि अन्य घटकांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी बाजारातील सुविधांचा आढावा घेतला. बाजाराची नियमित स्वच्छता, शौचालये, महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था आणि सौर दिवे यांसारख्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आढावा बैठकीस वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कौस्तुभ दिवेगावकर, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, बाजार समितीचे सचिव शरद जरे, आमदार शशिकांत शिंदे, माजी सभापती शंकरराव पिंगळे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कांदा-बटाटा बाजारातील जुन्या इमारतींच्या सद्यस्थितीचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नही बैठकीत चर्चेत आला. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती, पुनर्बांधणी अथवा पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना रावल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जुन्या इमारतींमध्ये गळती असल्यास ती तातडीने थांबवून आवश्यक दुरुस्ती करावी आणि इमारतींची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले.