कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑर्थोपेडिक डॉक्टर उपलब्ध नसल्याने फ्रॅक्चर झालेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी संबंधितांवर ठोस कारवाईची मागणी केली आहे.
बेतूरकर पाडा परिसरातील रहिवासी राम सोनी यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी त्यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले. मात्र, रुग्णालयात प्लास्टर उपलब्ध नसल्याचे सांगत बाहेरून प्लास्टर आणण्यास सांगण्यात आल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. दरम्यान, प्लास्टर उपलब्ध नसल्याने राम सोनी यांच्या पायाला पुठ्ठा लावण्यात आल्याचे समोर आले आहे. नाहीतर प्लास्टर बाहेरून खरेदी करून आणा असे देखील सांगितले असल्याचे जखमीचा मुलगा अभय सोनी यांनी सांगितले.
रुग्णालयात ऑर्थोपेडिक डॉक्टर नसल्यामुळे संबंधित तंत्रज्ञाकडूनही प्लास्टर करता आले नसल्याचे हॉस्पिटलकडून सांगितले जात आहे. या प्रकाराची माहिती मिळताच मनसेचे नगरसेवक गणेश लांडगे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयातील या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महापालिकेच्या रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यास सर्वसामान्य रुग्णांनी उपचारासाठी नेमके कुठे जावे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.