ठाणे पूर्वेत प्रथमच आमदार सराव दहीहंडी महोत्सव

ठाणे : ठाणे पूर्वेत भाजपच्या वतीने प्रथमच अष्टविनायक चौकात आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सराव दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप कार्यकर्ते पियुष बुकाणे यांनी दिली.

दहीहंडी आणि ठाणे यांचे अतूट नाते असून ठाण्याची दहीहंडी अवघ्या राज्याचे आकर्षण असते. या पार्श्वभूमीवर शहरात दहीहंडी सरावाला जोर आला असून ठाणे पूर्वेत देखील उत्साहाला उधाण आले आहे. भाजप कार्यकर्ते पियुष बुकाणे आणि सामाजिक कार्यकर्ते आणि हाऊस ऑफ स्वामीराजचे संचालक अजय केदारे यांनी आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पूर्वेत प्रथमच आमदार सराव दहीहंडी महोत्सव २०२६ या महासोहळ्याचे आयोजन रविवार १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता अष्टविनायक चौक येथे केले आहे. यावेळी आमदार संजय केळकर गोविंदांना मार्गदर्शन करणार आहेत.

सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती असेल तर उप महापौर कृष्णा पाटील, शहर अध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे, राज्याचे युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष समर्थ नायक, तसेच भाजपचे ठाणे महापालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.