राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा; राही सरनोबतला सलग तिसऱ्यांदा सुवर्ण

आशियाई क्रीडा स्पर्धेतील गतविजेत्या राही सरनोबतने महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना ६४व्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदकाची कमाई केली.

नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात महाराष्ट्राच्या राहीने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले. तिने आपले जेतेपद राखताना दमदार कामगिरी करत असलेल्या खेळाडूंना मागे टाकले. दिल्लीच्या १४ वर्षीय नाम्या कपूरने ३१ गुणांसह रौप्यपदक मिळवले. तिने नुकतेच कनिष्ठ जागतिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील राष्ट्रीय विजेत्या मनू भाकरला २७ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

तसेच भोपाळ येथे होत असलेल्या राष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धेत, ओदिशाच्या श्रीयांका सदांगीने (४५४.९ गुण) महिलांच्या ५० मीटर थ्री-पोझिशन प्रकाराचे अजिंक्यपद मिळवले. मध्य प्रदेशच्या मानसी कथित (४५३.५) आणि बंगालच्या आयुषी पोद्दारने (४४०.९) अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.