ठाणे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत ठाणे महापालिकेच्यावतीने रविवार २७ फेब्रुवारी, २०२२ रोजी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत नागरिकांनी ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओचे समुळ उच्चाटन करण्याचे ध्येय निर्धारीत केले असून, त्या पार्श्वभूमीवर भारतात सातत्याने पल्स पोलिओ विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ठाणे महापालिकेने उत्कृष्टपणे राबविली आहे. या मोहिमेस सर्व स्तरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
रविवार २७ फेब्रुवारी, २०२२ रोजी ठाणे महापालिकेच्यावतीने विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून, या मोहिमेतंर्गत ५ वर्षापर्यंतचे एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. सदर दिवशी महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी बुथवर व त्यानंतर पुढील पाच दिवस प्रत्येक घरोघरी जाऊन लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना पोलिओचे डोस देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.