नॅशनल मास्टर्स गेम्स ठाणेकर जलपरी रेखा गुप्ताला पाच सुवर्ण पदके

ठाणे: थिरुवनंतपुरम येथे झालेल्या चौथ्या नॅशनल मास्टर्स गेम्समध्ये ठाण्यातील रेखा गुप्ता यांनी जलतरण स्पर्धेत पाच प्रकारांत पाच सुवर्ण पदके पटकावली.

आठ महिन्याच्या बालकापासून ७५ वर्षाच्या वृद्धेला पोहण्यास शिकवणाऱ्या रेखा गुप्ता यांनी आजवर शेकडो जलतरणपटू घडवले असून अनेक राष्ट्रीय पुरस्कारही त्यांच्या नावावर आहेत. केरळमध्ये थिरुवनंतपुरम येथे १८ ते २२ मे दरम्यान चौथ्या नॅशनल मास्टर्स गेम्समध्ये रेखा गुप्ता यांनी ५० मीटर्स बॅक स्ट्रोक, १०० आणि २०० मीटर्स फ्री स्टायल, ४ बाय ५० मीटर्स फ्री स्टायल रिले आणि मेडली रिले अशा पाच प्रकारांत पाच सुवर्ण पदके पटकावली. या कामगिरीमुळे ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या स्पर्धेत ४५००हून जास्त खेळाडूंनी देशभरातून सहभाग घेतला होता.

नुकतीच त्यांनी श्रीलंकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्ण आणि दोन रजत पदके पटकावली आहेत. सध्या त्या ठाण्यात तीन ठिकाणी जलतरणाचे धडे देण्याचे काम करत आहेत.