राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राला सलग सातव्यांदा दुहेरी मुकुट

मुंबई : भुवनेश्वर येथील बिजू पटनायक बंदिस्त स्टेडियमवर झालेल्या ४०व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सलग सातव्यांदा जेतेपदावर नाव कोरले. अहमदनगरचा आदित्य कुदळे आणि उस्मानाबादची अश्विनी शिंदे या महाराष्ट्रातील खेळाडूंनी अनुक्रमे वीर अभिमन्यू आणि जानकी पुरस्काराची कमाई केली.

कुमार गटातील अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा १९-०८ असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या कुमार संघाने एकंदर ३२व्यांदा ही स्पर्धा जिंकली. आदित्य (२.३० मि. आणि पाच गडी), सूरज झोरे (नाबाद ३.४० मि. आणि दोन गडी), किरण वसावे (३.१० मि. आणि १ गडी) आणि विवेक ब्राह्मणे (३ गडी) या चौकडीने महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

कुमारींच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने कोल्हापूरवर १२-९ अशी मात केली. महाराष्ट्राच्या कुमारींचे हे एकूण २३वे विजेतेपद ठरले. अश्विनी (३.५०, २.४० मि.), संपदा मोरे (१.३० मि. आणि दोन बळी), दीपाली राठोड (१.१० मि. आणि दोन बळी), वृषाली भोये (दोन बळी) या चौघी महाराष्ट्राच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. दिल्लीचा ऋतिक आणि कोल्हापूरची वैष्णवी यांनी उत्कृष्ट संरक्षकाचा पुरस्कार मिळवला. ओदिशाचा पबानी साबर, महाराष्ट्राची वृषाली उत्कृष्ट आक्रमक ठरले.