ठाणे-पालघर संपर्क नेतेपदी नरेश म्हस्के

ठाणे: कोकण विभागातील शिवसेना (शिंदे गट) ठाणे आणि पालघरच्या संपर्क नेतेपदी माजी महापौर नरेश म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील ११ संपर्क नेते आणि ३९ निरीक्षकांची घोषणा आज करण्यात आली.

शिवसेना (शिंदे गट) यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याचा निर्धार केला. त्या बैठकीत राज्यातील सहा विभागांमध्ये संपर्क नेते नियुक्त करण्यात आले तसेच लोकसभा निरीक्षक देखिल जाहीर करण्यात आले आहेत. माजी आमदार रविंद्र फाटक यांची पालघर, प्रकाश पाटील-भिवंडी, माजी नगरसेवक बालाजी काकडे-लातूर, योगेश जानकर-हातकणंगले, जयंत साठे-नाशिक, शरद कणसे-सातारा, राजेंद्र फाटक-रत्नागिरी सिंधुदुर्ग, राजेंद्र चौधरी-शिर्डी असे ३९ निरीक्षक जाहीर करण्यात आले आहेत.

नियुक्त करण्यात आलेले नेते आणि निरीक्षक यांच्यावर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पक्ष संघटना देखिल मजबूत करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्त जाहीर केली. हे सर्व संपर्क नेते आणि निरीक्षक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या आदेशानुसार पक्ष संघटना मजबूत करतील, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.