ठाणे : धर्मवीर आनंद दिघेंसाहेबांचे शिष्य असलेले नरेश मणेरा यांनी उपमहापौर कालावधीपासून आजपर्यंत सतत कार्यरत राहून घोडबंदर परिसरात विकासकामे केलेली आहेत. नरेश मणेरा यांच्या या कार्याची दखल घेऊन घोडबंदर येथील मतदार त्यांना निश्चित आमदार करतील, नरेश मणेरा हे या मतदारसंघातील उद्याचे आमदार आहेत, असे मत शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख व वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत बोलत होते. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक रुची विनायक राऊत, युवासेना महाराष्ट्र सहसचिव धनश्री राजन विचारे, संगमेश्वर सभापती दिलीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेश मणेरा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र महोत्सवाचा कार्यक्रम १२ वर्षापासून सतत होत आहे. मला प्रथमच या महोत्सवाला येण्याचे भाग्य प्राप्त झाले. प्रवेश करताक्षणी नरेश मणेरा यांनी उभारलेल्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील श्री रामाचे साक्षात दर्शन झाले. महाराष्ट्र महोत्सवाला, प्रेक्षकांचा लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता नरेश मणेरा यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते. या विभागातील नागरिकांसाठी महाराष्ट्र महोत्सवात, नृत्य स्पर्धेच्या निमित्ताने घोडबंदर परिसरातील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नरेश मणेरा यांनी जो प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद असा आहे. त्यांच्या कामाचे येथील मतदार योग्य ते मुल्यमापन करुन तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत विजयाच्या मानाचे पान प्राप्त करुन देतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कोकण संपर्कप्रमुख संतोष कडू, कोपरी पाचपाखाडी विभागप्रमुख संजय ब्रीद, ओवळा माजिवडा उपशहरप्रमुख भास्कर बैरिशेट्टी, युवासेना विधानसभा सचिव सागर बैरिशेट्टी, मीरा-भाईंदर जिल्हा सचिव राजेशसिंग सूर्यवंशी, सुनील पाटील, प्रदीप पूर्णेकर, उमेश द्विवेदी, अजय तरे, भोजपूरी कलाकार ॲड. करण पांडे, महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, माजी नगरसेविका रागिणी बैरिशेट्टी आदी पदाधिकारी उपस्थित होते.