नरेंद्र मोदी हेच उमेदवार; अब की बार चारसौ पार !

महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांचा सूर

ठाणे : ठाणे लोकसभेचा उमेदवार ⁠कोण असेल यापेक्षा मोदींना ४०० पार जागा निवडून द्यायच्या आहेत यावर आमचे लक्ष असल्याचे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ⁠महायुतीचा पहिलाच मेळावा होतोय, तो ही ठाण्यात. त्यामुळे हा मेळावा खुप महत्वाचा आहे, ⁠ठाणे लोकसभेची कोणाला उमेदवारी दिली गेली याबाबत मला काही माहिती नाही, मात्र सन्मानजनक उमेदवार ठाण्यात दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ⁠ठाण्याचा पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचे काम महायुतीतील वरीष्ठांचे असल्याचेही ते म्हणाले.

या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. हा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून त्यांना कमीपणा येणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या मेळाव्यात आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, नजीब मुल्ला, माधवी नाईक, मीनाक्षी शिंदे यांच्यासह रिपाइं आठवले गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

महाराष्ट्रात पहिला जिल्हा असेल जेथे उमेदवार जाहीर होण्याआधीच मेळावा होत आहे. प्रत्येक निवडणूक हलक्यात घ्यायची नसते. आपण काय केले हे लोकांना सांगावे लागेल, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले.

इच्छुक उमेदवारांमध्ये संजीव नाईक, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश म्हस्के यांचे नाव घेतात. मात्र आमच्यात मतभेद आणि मनभेद नाहीत. कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही मोदींसाठीच काम करणार असल्याचे सरनाईक यांनी संगितले.