ठाणे : 12 ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुणे येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नॅन्सी बरौलिया हिला टंबलिंग जिम्नॅस्टिक्समध्ये कांस्यपदक मिळाले, त्यातून तिची केरळमध्ये 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय टंबलिंग जिम्नॅस्टिक्ससाठी निवड झाली आहे.
नॅन्सी लहानपणापासून जिम्नॅस्टिकची आवड जोपासत आहे. डोंबिवलीतील भोईर जिमखाना येथे प्रशिक्षक पवन भोईर आणि मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण ती घेत आहे. जवळपास गेल्या ११ वर्षांपासून अभ्यास सांभाळून ठाणे ते डोंबिवली प्रवास करून तिने खेळाची आवड जपली आहे. सध्या नॅन्सी केजी शाह लॉ कॉलेज माटुंगा येथून बीबीए एलएलबी करत असलेली कायद्याची विद्यार्थिनी आहे. नॅन्सीला तिची आई सोनिया बरोलिया यांचेही मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळते आहे. सोनिया यांची स्वतःची ठाण्यात कोसॅक जिम्नॅस्टिक अकॅडमी असून तिथेही नॅन्सी अधूनमधून सराव करते.
नॅन्सीने २०२२ मध्ये पुणे येथे झालेल्या टंबलिंग आणि ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तसेच चिपळूण येथे झालेल्या एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्टेट चॅम्पियनमध्ये दोन रौप्य पदक तर त्या आधी ऐरोली येथे झालेल्या सीआयएससीई स्पर्धेतही एक सुवर्ण पदक आणि दोन रौप्य पदक पटकावली आहेत.