पुनर्वसनाच्या यादीतून मराठी भाषिकांची नावे गायब?

मनसे पदाधिकाऱ्याचा आरोप

ठाणे : वर्तकनगर येथील म्हाडा अभिन्यासातील सर्व्हे क्रमांक 214 मध्ये वास्तव्यास असणार्‍या अनेकांची नावे पुनर्वसनाच्या यादीतून गायब करण्यात आला असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्याने केला आहे.

वर्तकनगर नाका येथील सर्व्हे क्रमांक 214 या भूंखडावर शॉपकिपर्स सोसायटी, आनंद अर्पामेंट, चाळ वसाहत, गाळेधारक अस्तित्वात आहेत. येथील काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. या भूखंडावर मोठा विकास प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी मूळ रहिवासी आणि गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या पुनर्वसनाच्या अनुषंगाने सर्व्हे करुन त्यानुसार त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. मात्र, पुनर्वसन करताना संबधित बांधकाम व्यावसायिकाला गाळेधारक किंवा सदनिका धारकांना मोबदला द्यावा लागू नये, यासाठी चक्क अनेकांची नावे ते वास्तव्यास असतानाही वगळण्यात आली आहेत, असा आरोप मनसेचे संतोष निकम यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे.

शहरविकास विभागातील अधिकाऱ्यांनी पालिकेमध्ये बसूनच ‘टेबल सर्व्हे’ केला असल्याने 25 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना आता अचानक बेघर व्हावे लागणार असल्याची भीती निकम यांनी व्यक्त केली आहे.

संबधित विभागाने या भागाचा फेरसर्व्हे करुन सर्व बाधित मराठी कुटुंबांचा यादीत समावेश करावा; अन्यथा, आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही मनसे शाखा अध्यक्ष संतोष निकम यांनी दिला आहे.