ठाणे: एकीकडे जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली असताना दुसरीकडे मतदार याद्यांमधून नावेच गायब झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
उद्यावर मतदान आले असताना ठाणे शहरात अनेक ठिकाणी मतदारांची नावे नसल्याचे आढळून येत आहे. गोखले मार्गावरील लक्ष्मी केशव इमारतीत सर्व रहिवाशांची नावे याद्यांमधून गायब झाल्याचे उघडकीस आले आहे तर पोखरण मार्ग-२ वरील स्वस्तिक गार्डन गृहनिर्माण संस्थेत ३० ते ३५ मतदारांकडे निवडणूक ओळख पत्र असताना त्यांची नावे मतदार यादीत नसल्याची तक्रार तेथील रहिवाशांनी केली आहे.
यादीत नावे नसल्याने अशा शेकडो मतदारांनी मतदान कसे करायचे याबाबत चिंता व्यक्त केली आहे. इलेक्शन कार्ड असल्याने त्या आधारे तरी मतदान करता यावे, अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघात दीड ते दोन लाख मतदार घरी आढळून आले नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. अशावेळी केवळ तांत्रिक अडचणींमुळे तरी मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.