ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने अनेक इच्छुकांची वर्णी विविध महामंडळांवर लावली आहे.
महाराष्ट्र ग्राहक संरक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप नेते संदीप लेले यांची तर, ‘माविम’च्या अध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या मिनाक्षी शिंदे यांची नियुक्ती केली आहे.
राज्य सरकारने याच महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये विविध महामंडळांच्या निर्मितीची घोषणा केली होती. यातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक नेत्यांच्या महामंडळावर नियुक्त्या करून सर्वांना खुश केले आहे. यापैकी महाराष्ट्र राज्य ग्राहक सरेक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या संदीप लेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांची वर्णी लावली आहे. ठाण्यातील या दोन महत्वाच्या नेत्यांकडे महत्वपूर्ण जबाबदारी दिल्याने महायुतीला ठाण्यातील गड सर करण्यास बळ मिळाले आहे.